लोणावळा : ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास विलंब का? अजून गुन्हाही दाखल नाही | पुढारी

लोणावळा : ‘त्या’ प्रकरणात गुन्हा दाखल होण्यास विलंब का? अजून गुन्हाही दाखल नाही

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत लोणावळा शहरात आलेल्या एका दोन वर्षांच्या चिमुकल्याला जलतरण तलावात पडून आपले प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना 13 जुलैच्या संध्याकाळी घडली. या घटनेला बुधवारी (दि.20) आठ दिवस होऊनही याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नसल्याने माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवबा अखिल पवार हा चिमुकला 14 जुलै रोजी आपला दुसरा वाढदिवस साजरा करणार होता. हा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी शिवबाचे कुटुंबीय त्याला आणि त्याच्या जुळ्या बहिणीला घेऊन शिक्रापूर येथून खास पर्यटन नगरी लोणावळा शहरात आले होते. याठिकाणी त्यांनी एक बंगला बुक केला होता. 13 जुलै रोजी संध्याकाळी साडे पाच ते साडे सहाच्या दरम्यान ते या बंगल्यात आले आणि पुढील केवळ 15 मिनिटात शिवबावर काळाने घाला घातला.

कामात व्यस्त असलेल्या आपल्या कुटुंबियांचा डोळा चुकवून शिवबा या बंगल्याला अगदी लागून असलेल्या स्विमिंग पुलाच्या दिशेने धावत गेला. त्याला कारणही तसेच होते. या स्विमिंग पुलमध्ये अनेक खेळणी तरंगत होती. त्या खेळण्याकडे आकर्षित होऊन त्यांच्याशी खेळण्यासाठी धावलेला शिवबा थेट जमिनीशी समतल असलेल्या स्विमिंग पुलमध्ये पडला. पाण्यात पडल्यानंतर या चिमुकल्याने पाण्याबाहेर पडण्यासाठी केलेली धडपड तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकणार्‍या या घटनेत चिमुकल्या शिवबाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती; मात्र त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या घटनेला 8 दिवस पूर्ण होऊनही याबाबत अद्यापी कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांकडे याबाबत चौकशी केली असता, या प्रकरणात तक्रार देण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आलेले नसून, या घटनेला जबाबदार कोण, हे देखील निश्चित झाले नसल्याने अद्याप कोणावरही दोषारोप ठेवता आलेला नाही आणि त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास देखील वेळ होत असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे. याबाबत सरकारी वकिलांचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांकडून सांगण्यात
आले आहे.

13 जुलैच्या संध्याकाळी घडलेली ही घटना त्यानंतर तब्बल सात दिवसांनी म्हणजे मंगळवारी 19 जुलैला उघडकीस आली. प्रसिद्धी माध्यमातून ही घटना समजल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी देखील या प्रकरणात लक्ष घालत ज्या स्विमिंग पूलमध्ये ही घटना घडली तो स्विमिंग पूल अधिकृत आहे की अनधिकृत आहे असा प्रश्न उपस्थित केला. अखेर बुधवारी (दि.20) लोणावळा पोलिसांनी ज्या स्विमिंग पुलमध्ये ही घटना घडली, तो पूल अधिकृत आहे की अनधिकृत अशी लेखी विचारणा नगरपरिषदेकडे केली आहे.

खरेतर ही विचारणा करण्यासाठी पोलिसांनी एवढे दिवस का घेतले हा देखील एक प्रश्न आहे. नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांनी सदर बंगल्याची सर्व कागदपत्रे आणि प्लॅन तपासून तसेच घटनास्थळाची पाहणी करून हा स्विमिंग पूल अनधिकृत असल्याचे सांगितले.पोलिसांना हे उत्तर मिळाल्यानंतर पोलिस पुढील पाऊल काय उचलणार, या अपघाताची जबाबदारी कोणावर निश्चित करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ळ्यातील स्विमिंग पूल अपघात प्रकरण

Back to top button