पिंपरी: ताथवडेतील चेंबर ओव्हरफ्लो; परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात | पुढारी

पिंपरी: ताथवडेतील चेंबर ओव्हरफ्लो; परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ताथवडे : ताथवडे पवारवस्ती जवळील लक्ष्मीबाई कॉलनी येथील मैलामिश्रित चेंबर ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साधारणतः 100 ते 150 लोकवस्ती असलेल्या लक्ष्मीबाई कॉलनीत काही वर्षांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्यात आली होती. परंतु, सध्या हीच ड्रेनेज लाईन सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. येथील चेंबर ओव्हरफ्लो झालेले असून यातील मैलामिश्रित पाणी लोकांच्या घरात जात आहे.

सध्या सर्वत्र पाउस सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यात हे मैलामिश्रित पाणी मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु, याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी सूचना देऊनही चेंबरची साफसफाई होत नाही. याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कॉलनीतील तीन चेंबर ओव्हरफ्लो झालेले आहेत. याच्या उग्र वासामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.ओव्हरफ्लो झालेले चेंबर आणि पावसाचे पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यातून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे साथीचे रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भरून वाहत असलेले चेंबर दुरुस्त करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

लक्ष्मीबाई कॉलनी येथील ड्रेनेज पाइपलाइन तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी जमा झाले आहे. मागील 5 वर्षांपासून महापालिकेच्या अधिकार्‍यांना वारंवार तक्रारी व निवेदने देण्यात आलेली आहेत. पावसाळ्याच्या आगोदर ड्रेनेज पाइपलाइन साफ केली नसल्याने याचा त्रास स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे.
– सिद्धेश सोनकवडे, स्थानिक रहिवासी

Back to top button