पुणे: खडकी स्टेशन-औंध रोडवर कोंडी नित्याचीच | पुढारी

पुणे: खडकी स्टेशन-औंध रोडवर कोंडी नित्याचीच

दापोडी : खडकी रेल्वे स्टेशनकडून औंधकडे येणार्‍या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालक दररोज येथील खड्डे बुजविताना दिसत आहेत. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी औंध रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्याची मागणी केली जात आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरून औंधकडे येणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. मात्र, या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी चेंबर टाकण्यात आले होते. तसेच, नागरिकांनीही पाणी, वीज घेण्यासाठी रस्ते खोदाई केली आहे. त्याचे मोठे खड्डे पडले आहेत.

खोदाई केलेल्या ठिकाणी डांबरीकरण होणे गरजेचे होते. मात्र, पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी या रस्त्याचे डांबरीकरण रखडलेले आहे. त्यामुळे औंध रोडवर साई मंदिराजवळ दररोज वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. जवळच शाळा असल्याने याचा विद्यार्थी-पालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात नित्याचे झाले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून दुचाकीस्वार जखमी होत आहेत. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे मागणी करूनही खड्डे बुजविले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांना कामावर जाताना व येताना या वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

खडकी रेल्वे स्टेशनकडून औंधकडे येणार्‍या रस्त्यावर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या नियोजनाअभावी दररोज वाहतूककोंडी होत आहे. त्यातच पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. या रस्त्यावरील एका बाजूची वाहतूक बोपोडी मार्गे वळवून हा रस्ता एकेरी करण्यात यावा. रस्ता एकेरी झाल्यास स्थानिक नागरिक, विद्यार्थी यांना मोठा दिलासा मिळेल.
– रामभाऊ जाधव, जिल्हाप्रमुख, छावा मराठा संघटना

Back to top button