विजेच्या लपंडावामुळे भोसरीकर हैराण | पुढारी

विजेच्या लपंडावामुळे भोसरीकर हैराण

भोसरी : परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरण विभागाचा अनागोंदी कारभाराचा फटका नागरिक, उद्योजकांना बसला आहे. वीज खंडित झाल्याने महावितरण अधिकार्‍याना माहितीसाठी फोन केल्यास तो न उचलणे, माहिती घेऊन सांगतो आदी कारणांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे.

महावितरण विभागाचा भोंगळ कारभाराचा नागरिकांतून संतप्त व्यक्त होत आहे. भोसरीतील नागरिकांना विजेचा लपंडाव नियमित झाला आहे. परिसरात कोणत्या ना कोणत्या भागातील वीजपुरवठा खंडित होतच असते. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठ्यपुरव्यामुळे वीज समस्या त्वरित सोडवली जाते. तर, काही ठिकाणी विद्युतपुरवठा सुरळीत कधी होईल हे महावितरणमधील अधिकार्‍यांनादेखील माहित नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेक ठिकाणी तर गायब झालेली वीज न आल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत असलयाचे चित्र भोसरी परिसरात दररोज पाहवयास मिळत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या. घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले. परंतु, ही समस्या सोडविण्यात महावितरणने स्वारस्य दाखवत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

भोसरी परिसरातील आदिनाथनगर येथील डीपी जळाल्याने खंडित झालेला वीजपुरवठा चोवीस तासांनी सुरळीत झाला. गव्हाणेवस्ती आणि हिंदी शाळेसमोरील भाग तर पाच दिवसांपासून अंधारातच असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच रामनगर, शिक्षक कॉलनी, वासू टॉवेर आदी परिसरातील विद्युतपुरवठा चार दिवसांपासून खंडित होता. महावितरणचे उपअभियंता यांना फोन केला असल्यास फोन उचला जात नाही व थोड्या वेळाने मेसेज येतो प्लीज टेक्स्ट मी. मेसेजवर आम्ही काय माहिती देणार. जर कधी उचलालच तर वीजपुरवठा सुरळीत कधी होईल हे अधिकार्‍यांनादेखील माहित नसते, असा तक्रारींचा पाढा परिसरातील नागरिकांनी वाचला.

Back to top button