पुणे : टर्मिनलवर प्रवाशांचे हाल | पुढारी

पुणे : टर्मिनलवर प्रवाशांचे हाल

पुणे : पुढारी वृत्तसेवा: रेल्वे प्रशासनाकडून पुणे स्टेशनवरील गाड्यांचा भार कमी करण्यासाठी हडपसर येथे रेल्वेचे टर्मिनल उभारण्यात आले आहे. मात्र, या टर्मिनलपासून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना येथून सामानाच्या अवजड बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. हडपसर येथील टर्मिनल एखाद्या गावातील रेल्वे स्थानकाप्रमाणेच वाटत आहे.

यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत रेल्वेच्या अधिकार्‍यांनी प्रवाशांना स्थानकावरील पायाभूत सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे. मात्र, स्थानकाबाहेरून प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची फीडर सर्व्हिसच नाही. ही सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रिक्षाचालकांकडून अवाच्या सवा भाडे
स्थानकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद असून, या रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यातून वाट काढत बॅगा घेऊन प्रवाशांना पायी जावे लागत आहे. त्यात जर एखादी रिक्षा मिळाली, तर रिक्षाचालक अवाच्या-सवा भाडे आकारत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

हडपसर रेल्वेस्थानकावरून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नाही. आमच्यासारख्या प्रवाशांना रेल्वे गाडीतून उतरल्यावर बॅगा घेऊन तब्बल दोन किलोमीटर चालत यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या मार्गावरून पीएमपी बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

                                                              – दिनेश शिंदे, रेल्वे प्रवासी

हडपसर रेल्वेस्थानकावर सध्या एकच तिकीट खिडकी आहे. गर्दीच्या वेळी या खिडकीवर बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने येथे आणखी तिकीट खिडक्या उपलब्ध करून द्याव्यात.

                                                                 – आशिष कदम, रेल्वे प्रवासी

Back to top button