राजगुरुनगर : शेकडो एकरावरील सोयाबीन पाण्यात; सातकरस्थळ, आरुडेवाडीत पेरणी वाया | पुढारी

राजगुरुनगर : शेकडो एकरावरील सोयाबीन पाण्यात; सातकरस्थळ, आरुडेवाडीत पेरणी वाया

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा: गेला आठवडाभर जोरदार पाऊस झाल्याने राजगुरुनगर (ता. खेड) परिसरातील आरुडेवाडी, सातकरस्थळ, कोहिनकरवाडी, काळेचीवाडी, बुट्टेवाडी शिवारातील जमिनी उपळल्या आहेत. विहिरी तुडुंब भरून बाहेर पडणारे पाणी उभ्या पिकातून वाहत आहे. शेतांमध्ये तळी साठली असून सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग आणि तरकारी, भाजीपाला पिके कुजून पिवळी पडू लागली आहेत. उसाचे शेत सपाट झाले आहे. या नुकसानीची पाहणी होऊन नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

खेड तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाउस झाला. तत्पूर्वी, पंधरा ते वीस दिवस अगोदर तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, बाजरीची पेरणी झाली होती. पेरणी झाल्यावर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र, पावसाचे प्रमाण वाढले. जमिनीत खोलवर पाणी मुरल्याने तसेच परिसरातील ओढे, नाले तुडुंब होऊन वाहू लागल्याने सखल भागांतील विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या. त्याचे पाणी शिवारात साठून पुढे वाहत गेले. ज्या भागात पाणी साठले तेथील पिके पिवळी पडू लागली आहेत. हे पाणी पुढचा महिना-दीड महिना असेच वाहत राहणार आहे.

हा शिवार नापीक होण्याची चिन्हे आहेत. सातकरस्थळचे माजी सरपंच मारुती सातकर, कोहिनकरवाडीचे अविनाश कोहिनकर, कुंडलिक कोहिनकर, तिन्हेवाडीचे माजी उपसरपंच रंगनाथ आरुडे, बुट्टेवाडीचे अ‍ॅड. संतोष तळेकर, काळेचीवाडी-पांगरीचे विशाल शिंदे यांनी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला. पुढील पिकांचीदेखील शाश्वती नाही. शेतकर्‍यांचे दुहेरी नुकसान होणार आहे. शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सोमवारी (दि. 18) तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, असे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांनी सांगितले.

सोयाबीन, मिरचीच्या शेतात पाणी साठल्याने नुकसान झाले. हे पाणी पुढचे महिना-दोन महिने हटणार नाही. खरिपात काहीच हाती लागणार नाही. पुढच्या पेरणीच्या वेळी भिजलेली नापीक जमीन पीकयोग्य करताना खतांसाठी नव्याने खर्च करावा लागेल.

                                                     – भिकाजी करमारे, शेतकरी, आरुडेवाडी

चासकमान डावा कालव्याचे आवर्तन सतत सुरू असते. गळती, पाझरामुळे उन्हाळ्यात अनेक ठिकाणच्या शेतात पाणी वाहते. पावसाळ्यात पूर्व बाजूला भिंतीला पाणी अडून पिके पाण्याखाली जातात. शिवाय उपळणारे पाणी वाहत राहते. येथील शेतकरी हतबल आहे.

                               – खंडेराव थिगळे, अध्यक्ष, सिद्धेश्वर सोसायटी, राजगुरुनगर

Back to top button