खडकीतील नदीपात्रात पाण्यात अडकली कार | पुढारी

खडकीतील नदीपात्रात पाण्यात अडकली कार

खडकी : पाण्याचा अंदाज न आल्याने एक कार नदीच्या पाण्यामध्ये दुभाजकाला अडकून फसली. गाडीमध्ये महिला, पुरुष, दोन मुले अडकले होते. खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नाने गाडीतील चौघांसहित एका श्वानाचा जीव वाचविला.पुणे शहरामध्ये संततधार पावसामुळे नद्यांची पातळीमध्ये वाढ झाली आहे. दापोडी येथील हॅरिस ब्रिजचा भुयारी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी आले.

वाहतूक नियंत्रण शाखेकडून रस्ता बंद करण्यासाठी बॅरिकेड लावण्यात आले होते, मात्र कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सीएमई) मधील विंग कमांडर एस. एस. मराठे यांनी आपली टाटा सफारी एमएल 05 पी आय 7461 बॅरिकेड सरकवून भुयारी रस्त्यावरून पुढे नेली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार दुभाजकाला अडकली.

पाणीपातळीत वाढ होत असल्याने कारमधील महिला, पुरुष, दोन मुले आणि त्यांचे श्वान अडकून पडले. हॅरिस पुलाखालील भुयारी रस्त्यावर पुलाच्या खाली नदीच्या पाण्यामध्ये कार अडकून पडल्याची माहिती खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाला बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मिळाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने प्रयत्नांची पराकाष्टा करीत चौघांसहित श्वानाला बाहेर काढले.

अग्निशामक दलाचे जवान पाण्यामध्ये उतरले असता त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी असल्याचे अग्निशामक दलाचे सतीश कांबळे यांनी सांगितले. ही घटना साडेसातच्या ,सुमारास घडली असून कारमधील प्रवाशांना सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नाने बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले. या कामगिरीमध्ये दलाचे प्रताप सिरसवाल, पंकज तायडे, अजिंक्य वाळुंज, विकास हरीहरी, अतुल तरडे यांनी चोख पार पाडली. पाण्यामध्ये कार अडकल्याची माहिती मिळताच बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

Back to top button