पिंपरी : ‘आरटीई’च्या तिसर्‍या फेरीत 52 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित | पुढारी

पिंपरी : ‘आरटीई’च्या तिसर्‍या फेरीत 52 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

पिंपरी : शहरामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये सुरू असलेल्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील टप्पा क्रमांक तीनमध्ये 52 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेसाठी 16 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शहरातील शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. निवड यादीतील सोडत काढल्यानंतर 6 एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यासाठी प्रथम 20 एप्रिलपर्यंत मुदत होती. त्यानंतर ही मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतरही विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण न झाल्याने 10 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

शहरातील खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी एकूण 3 हजार 255 जागा रिक्त होत्या. त्यापैकी निवड यादीत 2 हजार 23 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील टप्पा क्रमांक तीनमध्ये आज अखेर 179 विद्यार्थ्यांपैकी 52 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. दरम्यान, अद्याप प्रतीक्षा यादीतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणे बाकी आहे. त्यामुळे 16 तारखेपर्यंत त्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.

Back to top button