पावसामुळे मावळातील पर्यटन बहरले | पुढारी

पावसामुळे मावळातील पर्यटन बहरले

कामशेत : मावळ तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरल्यामुळे पवन मावळ व नाणे मावळामध्ये असलेल्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसत आहे. पुणे, मुंबईतील हजारो पर्यटक दररोज येत असल्यामुळे मावळ परिसर गर्दीने फुलून गेला आहे. नाणे मावळातील कोंडेश्वर मंदिर हे पुणे-मुंबई हायवे व लोहमार्ग असलेल्या कामशेत शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथील नयनरम्य परिसर त्या मंदिराच्या परिसरात डोंगर आहे. त्या डोंगरातून वाहणारे धबधबे हे डोळ्यांचे पारणे फिटणारे आहे. कोंडेश्वर मंदिरापासून ढाक भैरी किल्ला दिसून येतो. शिवाय कोंडेश्वरकडे जाताना थोरण, शिरदे या भागातील रस्त्यांच्या बाजूला असणार्‍या डोंगरातून वाहणारे पाणी धबधबे यामध्ये भिजण्याचा आनंद घेणारे दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर मावळत येत असतात.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे पर्यटक फिरकले नव्हते. या वर्षी पावसानेे जूनच्या महिन्याअखेरीस चांगला जोर धरला. याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. परंतु, पावसामुळे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे व्यावसायिकांना याचा चांगलाच फायदा होत आहे. गेली काही दिवस चांगला पाऊस पडत आहे. जस-जसा पावसाचा जोर वाढत आहे तसं तसे पर्यटकांची संख्याही मावळात वाढत चालली आहे.

लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी किल्ले तर बेडसे व येलगोल येथील लेणी, पवना धरण, असंख्य धाब्ये, प्रतिपंढरपूर व प्रसिद्ध शिवकालीन वाघेश्वर (शिवमंदिर) देवाचे मंदिर आदी पर्यटनस्थळे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. पवन मावळात जाण्यासाठी मुबंईकडून येत असल्यास लोणावळ्यापासून 20 किलोमीटर दुधीवरे खिंडीतून प्रवास करत आपण पवना धारण पाशी येतो. या खिंडीपासून लोहगड व विसापूर अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याकडून येत असल्यास कामशेत शहरपासून 15 किलोमीटर अंतरावर पवना धरण परिसरात जाता येते. जाताना बौर घाट पूर्ण केल्यावर करूंज गावातून बेडसे लेणीला जान्यासाठी 2 किलोमीटर अंतर आहे.

Back to top button