एक कोटीचा गुटखा जप्त; एकास अटक, चाकण पोलिसांची कारवाई | पुढारी

एक कोटीचा गुटखा जप्त; एकास अटक, चाकण पोलिसांची कारवाई

महाळुंगे/चाकण; पुढारी वृत्तसेवा: शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखाची टेम्पोतून वाहतूक करणार्‍या एकास अटक करुन पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गणेश विठ्ठल भाडळे (वय 32, रा. कोयाळी, ता. खेड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. गुटखा आणि टेम्पो असा 1 कोटी 1 लाख 20 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई रविवारी (दि.10) दुपारी पुणे नाशिक महामार्गावर रोहकल फाटा, वाकी खु. (ता. खेड) येथे चाकण पोलिसांच्या पथकाने केली आहे.

अमली पदार्थ व गुटखा विक्रीच्या गुन्ह्यास प्रतिबंध होण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सूचनांनुसार चाकण पोलिसांनी परिसरात काही जणांवर लक्ष ठेवले होते. चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांना टेम्पोमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पुणे नाशिक महामार्गावर टेम्पो (एमएच 22 ए ए 1710) तून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी वाकी खु. गावाच्या जवळ रोहकल फाटा येथे संबंधित टेम्पोची तपासणी केली असता तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

गुटख्यासह टेम्पो वाहन पोलिसांनी जप्त केले असून चालकास अटक करण्यात आली आहे. याबाबत चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रसन्न ज-हाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक निलेश चव्हाण, सहाय्यक फौजदार सुरेश हिंगे, हवालदार संदिप सोनवणे, भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे आदींच्या पथकाने केली.

Back to top button