ठाकरेंचीच सेना खरी!; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत | पुढारी

ठाकरेंचीच सेना खरी!; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच मूळ शिवसेना आहे, असे त्यांचेही म्हणणे आहे आणि आम्हालाही वाटते. सर्वोच्च न्यायालयात होणार्‍या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात व्यक्त केले. ‘राज्यात मागील काही दिवसांत अनेक राजकीय उलथापालथी झाल्या, तरीही प्रमुख पक्षांना काहीच फटका बसलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त पवार बालगंधर्व रंगमंदिरात आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘खरी सेना कोणाची, हे सोमवारी न्यायालयात स्पष्ट होईल. आपण काही तज्ज्ञ वकिलांना बोललो असून, 16 लोकांचा वेगळा निकाल लागू शकतो, असे वाटते.’

राजकीय हट्ट नडेल
‘कांजूरमार्गे मेट्रो प्रकल्पाबाबत आमच्या सरकारने संयमी निर्णय घेतला. परंतु नव्या सरकारने आर ए कारशेड मार्गेच मेट्रो जाईल, असा राजकीय हट्ट धरला आहे. हाच निर्णय अडचणीचा ठरू शकतो. विकास प्रकल्पात राजकीय भूमिका बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला पाहिजे. स्वत:चा राजकीय हट्ट सोडून जनतेचा फायदा कशात आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे,’ असेही पवार यांनी म्हटले आहे.

..म्हणून विकासाचा निधी रद्द करायचा नसतो
आमच्या काळातील जिल्हा नियोजन व विकास समितीचा (डीपीडीसी) निधी या सरकारने रद्द केला आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात न्याय मागितला जाणार आहे. सरकार बदललं म्हणून विकासाचा निधी रद्द करायचा नसतो, असा टोलाही पवार यांनी नव्या सरकारला लगावला.

आयोगाने ओबीसी आरक्षणाचा विचार करावा
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर करणे चुकीचे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यासंदर्भात नेमलेल्या समितीने मध्य प्रदेशच्या धर्तीवरच काम केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाचा विचार करणे गरजेचे आहे, असेही पवार यांनी सांगितले.

समीकरण बदलले तरी आघाडीबाबत विचार….
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका आणि दिशा ठरविण्यासंदर्भात शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. समीकरण बदलले असले, तरी एकत्र सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी भूमिका पवार यांनी मांडली.

Back to top button