चाकणला रताळ्यांची आवक वाढली | पुढारी

चाकणला रताळ्यांची आवक वाढली

चाकण : पुढारी वृत्तसेवा: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 9) रताळ्यांची मोठी आवक झाली. मात्र, घाऊक बाजारात ग्राहक नसल्याने रताळ्यांची अपेक्षित विक्री व चांगला भाव मिळाला नसल्याच्या तक्रारी शेतकरी आणि विक्रेत्यांनी केल्या. भाव आणि आवक सरासरी एवढी असतानाही मागणी घटली आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने किरकोळ ग्राहक घराबाहेर पडत नाहीत. मार्केट मधील व्यापारीही ग्राहकांचा अंदाज पाहून मोठी खरेदी करत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आषाढी एकादशीला रताळ्यांना चांगली मागणी असते. वाढीव दरही मिळतो, म्हणून शेतकरी आषाढी एकादशीला काढणीला येतील, असे नियोजन करून रताळी लागवड करतात. खास आषाढी एकादशीसाठी कष्टाने पिकविलेली रताळी अपेक्षेप्रमाणे विक्री झाली नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या. शनिवारी पहाटे बाजार समितीत रताळ्यांचे ट्रक घेऊन आलेले शेतकरी सायंकाळपर्यंत विक्रीच्या प्रतीक्षेतच होते. रताळ्यांची विक्री होण्यासाठी त्यांना रविवार उजाडणार आहे. पावसाच्या रिपरिपीत, थंडी-वार्‍यात शेतकरी खेड बाजार समितीच्या चाकण येथील मार्केटमध्ये तळ टाकून आहेत.

दरम्यान, गतवर्षी कोरोना पार्श्वभूमीवर रताळ्यांना अपेक्षित भाव मिळाला नव्हता. यंदा चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. चाकण मार्केटमध्ये रताळ्यांची आवक वाढली. अन्य राज्यांतील रताळ्यांचीदेखील आवक झाली आहे. घाऊक विक्रीचा भाव आकारानुसार 25 ते 35 रुपये प्रति किलो एवढा होता, असे अडते असो.चे अध्यक्ष कुमार गोरे यांनी सांगितले. दरम्यान, किरकोळ बाजारात रताळ्यांना 40 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे.

Back to top button