मावळच्या सर्व विभागात पावसाची जोरदार हजेरी | पुढारी

मावळच्या सर्व विभागात पावसाची जोरदार हजेरी

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात मान्सूनच्या जोरदार पावसाने ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला असून सर्व नाले व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेली पाच-सहा दिवस मावळच्या सर्व विभागात जोरदार पाऊस पडत असून आणि पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे.

तालुक्यातील पवना, इंद्रायणी, कुंडलिका, आंध्रा, सुद्धा या नद्यांना पूर आला असून, या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.  तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डोंगरी विभागात पावसाचे प्रमाण सर्वांधिक असून डोंगर उतारावर धबधबे जोराने वाहत आहेत. तर, नदी, नाले, तलाव भरून वाहत आहेत.

गेल्या शनिवारपासून तालुक्यात पावसाची जोरदार सुरुवात झालेली असून, जनजीवनही विस्कळीत झाले आहे. अंदर मावळ विभागातील टाकवे, वडेश्वर, वाहनगाव, खांडी, कुसुर या परिसरात पावसाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे स्थानिक शेतकरी दत्तात्रय खांडभोर यांनी सांगितले.

पवना, वडिवळे तसेच आंध्रा धरण परिसरात पावसाचे प्रमाण सर्वांधिक असून, या धरणाचा जलसाठा दररोजच वाढत आहे. एकाच आठवड्यात ही धरणे सुमारे 20 ते 40 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. जोरदार पाऊस पडू लागल्याने खरीप भात पिकाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात चालू झालेल्या आहेत. मात्र भात लावणीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झालेली आहे.

Back to top button