पुणे : कुसगाव खिंडीत दरड कोसळली | पुढारी

पुणे : कुसगाव खिंडीत दरड कोसळली

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वेल्हे, भोर व हवेली तालुक्यांतील गावे जवळच्या अंतराने जोडणार्‍या कुसगाव खिंडीत दरडी कोसळत आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी (दि. 6) कुसगाव खिंडीतील वळणाजवळ भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक जवळपास बंद झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने जेसीबीच्या साह्याने दरडीचे दगड, माती मलबा बाजूला हटविला. त्यामुळे वाहतूक कशीबशी सुरू झाली.

करंजावणे-शिवापूर रस्त्यावरील कुसगाव खिंडीत कोसळलेली दरड हटविण्यात आली. दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

                          – संजय संकपाळ, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, वेल्हे

अनेक वर्षांपासून कुसगाव खिंड रस्त्यावर दरडी कोसळत आहेत. पुणे, सिंहगड, खेड-शिवापूर भागात जाण्यासाठी जवळचे अंतर असल्याने खिंड रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. कुस खिंडीत काम न झाल्यास तीव— आंदोलन करण्यात येईल.

                                        – तानाजी मांगडे, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

Back to top button