अतिवृष्टीसाठी आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहावे; मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश | पुढारी

अतिवृष्टीसाठी आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क राहावे; मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

भोर : पुढारी वृत्तसेवा; हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आपत्ती व्यवस्थापनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. लोकांना रस्ते, आरोग्य, अन्नधान्य, वीज या सुविधा कायम राहतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. महाड रस्त्यावरील दरडी पडलेल्या वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ व इतर ठिकाणी, तसेच कोंढरी गावाला भेट देऊन आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. या वेळी आयुष प्रसाद यांनी सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, पाणीपुरवठा, ग्रामसेवक यांना सूचना दिल्या आहेत.

या वेळी गटविकास अधिकारी स्नेहा देव, उपअभियंता इक्बाल शेख, प्रभाकर पाटील, आरोग्याधिकारी डॉ. सूर्यकांत कर्‍हाळे, विकास सोनवणे, नायब तहसीलदार अजिनाथ गाजरे, मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी प्राजक्ता जाधव, सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी रस्त्यावर पडून रस्ता बंद झाला, तर तत्काळ रस्त्यावरील दरडी हटवा. लोकांना आरोग्य, पिण्यासाठी पाणी, वीजपुरवठा सुरळीत ठेवा. आरोग्यसेवा, अन्नधान्य पुरवठा व्हावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश या वेळी आयुष प्रसाद यांनी दिले.

मागील वर्षी झालेल्या भूस्खलनाचा काही ढिगारा अजूनही डोंगराच्या नाल्यांमध्ये आहे. जरी ते जीवितास किंवा कोणत्याही मालमत्तेला थेट धोका देत नसला, तरी रहदारीला व्यत्यय आणू शकतो. कोणत्याही भूस्खलना पासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लोक हलवू शकतील, अशी सुरक्षित ठिकाणे, धोकादायक क्षेत्रे भूवैज्ञानिकांच्या मदतीने ओळखण्यात आली आहेत. ग्रामस्थांशी चर्चा केली आहे. रेशनचा पुरवठा आगाऊ करण्यात आला आहे. प्रत्येक गावात प्रथमोपचार आणि आवश्यक औषधे उपलब्ध आहेत.

रस्ता खचला, दरडी पडल्या, तर रुग्णवाहिका, जेसीबी तयार ठेवले आहेत. ग्रामपंचायतींकडे तत्काळ आणि आवश्यक मदतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध केले आहे. रस्त्यांची आवश्यक दुरुस्तीही पूर्ण झाली आहे. डोंगरी तालुक्यातील तालुका पथके कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेत आहेत. पावसाळ्यात रस्ते, वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवा अखंड राहण्यास उपाययोजना केल्या असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 

Back to top button