हनीट्रॅप : विद्यार्थ्याकडून टोळीने उकळले २० लाख, घाबरून तक्रारीस टाळाटाळ | पुढारी

हनीट्रॅप : विद्यार्थ्याकडून टोळीने उकळले २० लाख, घाबरून तक्रारीस टाळाटाळ

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पनवेल येथील बांधकाम व्यवसायिकाला आपल्या जाळ्यात खेचून लुटलेल्या हनीट्रॅप टोळीतील तरुणीने इतर साथीदारांच्या मदतीने गोपाळपट्टी मांजरी येथील एका विद्यार्थ्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवसायिकाने हनीट्रॅप ची तक्रार देण्याचे धाडस दाखविल्यानंतर कोंढवा पोलिसांनी सुरुवातीला या टोळीला जेरबंद केले होते.

दरम्यान, पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना सोशल मिडीयावरून जाळ्यात ओढून सात ते सात जणांकडून खंडणी स्वरूपात लाखो रूपये उकळल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी लोणीकाळभोर पोलिसांनी साईराज कानकाटे, प्रतिक लांडगे, ऋतुराज कांचन, सिद्धार्थ आमले या चौघांना अटक केली.

कोंढवा पोलिसांनी लावला छडा

कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून हनीट्रॅप टोळीला पकडल्यानंतर या तरुणाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तरुणीने या विद्यार्थी तरुणासोबत सुरुवातीला इन्स्टाग्रामवरून ओळख केली. त्यानंतर त्याला उरुळीकांचन परिसरात भेटण्यास बोलविले.

त्या ठिकाणी त्याच्यासोबत तरुणीने जबरदस्तीने संबंध ठेवले. त्यानंतर साथीदारांना बोलवून घेतले.

फिर्यादी यांना यवत पोलिस ठाण्यासमोर घेऊन गेले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 50 लाख रूपयांची खंडणीची मागणी केली. शेवटी तडजोड म्हणून 20 लाख रूपये त्यांच्याकडून घेतले.

याप्रकरणी, 20 वर्षीय विद्यार्थी तरुणाने लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिऱ्याद दिली आहे.

त्यानुसार 19 वर्षाच्या तरुणीसह तौसिफ शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 ते 20 ऑक्टोबर 2020 मध्ये घडली आहे.

अटक करण्यात आलेले चौघे आरोपी हे तरुणीच्या इतर साथीदारांच्या संपर्कात होते. त्यातूनच त्यांनी त्यांनी विद्यार्थी तरुणाला हनीट्र’पमध्ये अडकवून पैसे उकळले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कित्येकांना जाळ्यात अडकवले

दरम्यान कोंढवा पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यात रवींद्र भगवान बदर (वय 26, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय 40, रा. गोकुळनगर, कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय 32, रा. बाणेर, मूळ- माढा, सोलापूर), मंथन शिवाजी पवार (वय 24, रा. इंदापूर), आणि 19 वर्षीय तरुणी यांना अटक केली होती.

या तरुणीकडे चौकशी केल्यानंतर ती अनेकांसोबत संपर्कात असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी चौकशी केली.

त्यावेळी तिने पुणे ग्रामीण परिसरातील सहा ते सात नागरिकांना अशाच पध्दतीने जाळ्यात ओढळून लाखो रूपये खंडणीस्वरुपात उकळल्याचे समोर आले आहे.

पण, बदनामीच्या भितीने कोणी तक्रार देण्यास पुढे आलेले नाही. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी व त्यांच्या इतर साथीदारांनी अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला असल्याची शक्यता आहे. जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी लोणीकाळभोर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले आहे.

Back to top button