पुढारी ऑनलाईन डेस्क: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. राणे मंत्री झाल्यानंतर त्यांच्या टिकेला धार आली आहे. तर ठाकरे पूर्ण दुर्लक्ष करून राणे यांना बेदखल करत आहेत. एकेकाळी शिवसेनेत शब्दाला वजन असलेले राणे बाहेर का पडले, उद्धव आणि राणे यांच्यात नेमका काय वाद झाला याबाबत अजूनही उत्सुकता आहे.
शिवसेनेचा मुंबईतील एक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास.
युतीचे सरकार असताना मनोहर जोशी यांना हटवून बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. राणे यांनी अल्पावधीत प्रशासनावर पकड मिळविली. पक्षातही आपले स्थान पक्के केले.
मात्र, १९९९ ला पक्षाची सत्ता गेली आणि राणे यांच्या राजकीय जीवनाला उतरती कळा लागली.
पुढे गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.
काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष आणि भाजप असा प्रवास करत आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असे. नारायण राणे शिवसेनेचे शाखाप्रमुख असताना नगरसवेक झाले.
त्यानंतर त्यांना बेस्टचे चेअरमन म्हणून संधी मिळाली. पुढेत ते आमदार झाले आणि मंत्री, मुख्यमंत्री अशी चढती कमान चढत राहिले.
बाळासाहेबांचे निकटवर्तीय अशी त्यांची ख्याती होती. मात्र, शिवसेनेत वाढत चालेलेले त्यांचे वर्चस्व हा अनेकांच्या अस्वस्थतेचा मुद्दा होता.
राणेंबद्दल काटशाहाचे राजकारण सुरू झाले ते राज्यात सत्ता आल्यानंतर विधानसभेवर भगवा फडकवू अशा घोषणा शिवसैनिक देत होते.
मात्र, हे स्वप्न १९९५ च्या निवडणुकीत पूर्ण झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले.
त्यावेळी राणे, राज ठाकरे आणि स्मिता ठाकरे अशा नेत्यांचा एक आणि उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई अशा नेत्यांचा दुसरा गट होता.
या दोन्ही गटांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. राज ठाकरे आणि नारायण राणे हे बाळासाहेबांच्या निकट होते.
त्यामुळेच राणे यांना अल्पकाळासाठी का असेना मुख्यमंत्रीपद मिळाले. उद्धव ठाकरे राणे यांना पद देण्याविरोधात होते. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद वाढत गेला.
१९९९ ला अटलबिहारी वाजपेयी यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या आणि राज्यातही मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या.
यावेळी बाळासाहेब ठरवतील तो उमेदवार असे शिवसेनेत होते. नारायण राणे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या मर्जीतील उमेदवारांना यादीत स्थान मिळाले होते.
मात्र, ही यादी उद्धव ठाकरे यांनी परस्पर बदलली होती, असा आरोप राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे.
जागावाटपात शिवसेनेला १७१ तर भाजपला ११७ जागा देण्यात आल्या होत्या. मित्र पक्षांना १० जागा शिवसेना सोडणार असे ठरले होते.
अंतिम यादी बाळासाहेबांच्या सहीने सामना दैनिकात जात होती. ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ठाकरे यांनी १५ नावे बदलली.
त्यामुळे बंडखोरी झालेले ११ उमेदवार अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढले. ते निवडून आले.
या निवडणुकीत शिवसेनेला ६९ आणि भाजपला ५७ जागा मिळाल्या. काँग्रेसला ७५ तर राष्ट्रवादीला ५६ जागा मिळाल्या होत्या.
सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घेतली असती तर कदाचित सत्ता आली असती मात्र, तसे झाले नाही. राणे यांची ही संधी उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेली असा आरोप ते आजही करतात.
२००२ मध्ये महाबळेश्वर येथे राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली. ही बैठक शिवसेनेमध्ये नेतृत्वबदलाची बैठक ठरली.
या बैठकीमुळे राज ठाकरे आणि नारायण राणे यांना बाहेरचा मार्ग चोखाळावा लागला. राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रमुख पदाचा प्रस्ताव बैठकीत मांडला.
या प्रस्तावाला नारायण राणे यांचा विरोध होता. बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगितले.
मात्र, ते फारसे खरे नव्हते असे अनेकांचे म्हणणे आहे.
१९९९ मध्ये विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले २००२ मध्ये काही अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतला.
सरकार अल्पमतात आल्याचे सांगत सरकार पाडण्याचा घाट नारायण राणे यांनी घातला. अनेक आमदार त्यांनी गळाला लावले होते.
मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सरकार पाडण्याच्या योजनेला आपला पाठिंबा नाही, असे जाहीर केले.
त्यामुळे राणे बॅकफूटवर आले. केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर या घडामोडी घडल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनीही हा बेत हाणून पाडला असा राणे यांना संशय होता.
२००२ मध्ये नारायण राणे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळीच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची कण्कवलीजवळ हत्या झाली.
त्यावेळी राणेंचे कणकवलीतील घर पेटवले. त्यावेळी शिवसेनेचा एकही नेता किंवा कार्यकर्ता पुढे आला नाही. राणे पूर्ण एकाकी पडले.
राणे यांच्या मदतीला कुणीही जाऊ नये असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिल्याचा राणे यांचा अंदाज होता.
त्यामुळे राणे पुन्हा शिवसेनेपासून दुरावले.
२००४ च्या निवडणुकीत पक्षाची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. राणे यांची घुसमट वाढत चालली होती.
तरीही राणे पक्षासाठी प्रचार करत होते. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार निवडले तरी राणे प्रचार करून आपणच सेनेचा नेता असल्याचे सांगण्यास कळवत होते.
त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले. धुसफूस वाढली असताना रंगशारदा येथे शिवसैनिकांचा मेळावा घेतला.
या मेळाव्यात राणे यांनी 'सेनेत पदांचा बाजार मांडला जातोय' असे जाहीर वक्तव्य केले. या वक्तव्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.
अखेर २००५ मध्ये राणे यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरील टिकेला धार आली.