कोल्‍हापूर : इस्‍त्री व्यावसायिकाची प्रामाणिकता; सोन्याचे ब्रेसलेट केले परत | पुढारी

कोल्‍हापूर : इस्‍त्री व्यावसायिकाची प्रामाणिकता; सोन्याचे ब्रेसलेट केले परत

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  येथील एका इस्त्री व्यावसायिकाला इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यात ग्राहकाचे 3 तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट मिळून आले होते. व्यावसायिकाने प्रामाणिकपणे हे ब्रेसलेट ग्राहकाला परत करत माणुसकी जोपासली. कोरोना सदृश्य परिस्थितीत माणूस आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीच्या वेळी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील कलगोंड पोमाजे या प्रगतशील शेतकऱ्याने नेहमी प्रमाणे कपडे इस्त्रीसाठी शहरातील सोनाली ड्रायक्लीनर्स येथे दिले होते. मालक हरिबा कुंभार यांनी कपडे मशीनमध्ये घालून ब्लिचिंग केले.

यानंतर तिसऱ्या दिवशी कपडे इस्त्री करतेवेळी तानाजी कुंभार यांना सोन्याचा ब्रेसलेट निदर्शनास आला. त्‍यांनी तात्‍काळ ही बाब धनाजी कुंभार, उदय कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिली.

दुकानाचे मालक तानाजी कुंभार यांनी सदर क्रमांकाचे कपडे पोमाजे यांचे असल्याचे समजताच पोमाजे यांना तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्‍यांच्या कपड्यामध्ये सोन्याचे ब्रेसलेट मिळाल्‍याचे त्‍यांना सांगितले. त्यांना दुकानात बोलवून घेत दिगंबर कदम, नामदेव सोनवणे यांच्या समक्ष प्रामाणिकपणे ब्रेसलेट परत केले.

यापूर्वीही अनेक ग्राहकांच्या पॅन्टच्या खिशातून हजारो रुपये चुरगाळलेल्या स्थितीत मिळून आले होते. ते पैसे प्रामाणिकपणे परत करत त्‍यांनी माणुसकी जोपासली आहे.

आज सोन्याचा ब्रेसलेट ग्राहकाला परत करून आपल्या प्रमाणिकपणे पार पाडत असलेल्‍या कर्तव्याची परंपरा या इस्त्री व्यावसायिकाने जोपासली आहे.

या प्रामाणिकपणाबद्दल कलगोंड पोमाजे यांनी कुंभार बंधूंचा सत्कार केला. आर्थिक रूपाने बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र कुंभार बंधूंनी हे आमचे कर्तव्य आहे.

ग्राहक हा देवता असतो असे सांगत बक्षिसाची रक्कम घेण्यास नकार दिला.

कोरोना आणि महापुरामुळे माणूस आर्थिक कचाट्यात सापडला आहे. अशा परिस्‍थितीत माणुसकी हरवत चालली आहे. 3 तोळ्यांचे ब्रेसलेट गहाळ झाल्याने गेली 4 दिवस आम्ही चिंतेत होतो.

सोनाली ड्रायक्लीनर्स येथे गेल्या पंचवीस वर्षापासून कपडे इस्त्रीसाठी देत आहोत. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल आमचा विश्वास आणखीन दृढ झाला असल्याचे कलगोंडा पोमाजे यांनी सांगितले.

Back to top button