पीएमपी प्रवाशांना लावली उलटी साफ करायला; दोन ई-बसमधील प्रकार | पुढारी

पीएमपी प्रवाशांना लावली उलटी साफ करायला; दोन ई-बसमधील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा: एसी बंद असल्याने तब्येत बिघडल्याने महिला, युवकाने ई-बसमध्ये उलटी केली. वाहकांनी दंडेलशाही करत या दोघांनाही बस साफ करायला लावली. दोन वेगवेगळ्या मार्गांवर हे प्रकार घडले. दोन्ही प्रवाशांची प्रकृती बिघडली. तरीही दोन्ही बसमधील चालक-वाहकांनी माणुसकीशून्य वर्तन केले. या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. दोन आठवड्यांपूर्वीच्या या घटना आहेत. पहिल्या घटनेत महिलेने ई- बसमध्ये उलटी केली.

या महिलेची तब्येत बरी नसतानाही वाहकाने बस स्वच्छ करायला भाग पाडले, तर दुसर्‍या घटनेत डेक्कन भागात मंगळवारी (दि 28 जून) दुपारी 12 वाजता निगडीहून-कात्रजकडे जाणार्‍या बस क्रमांक 42 मध्ये प्रवास करताना 23 वर्षीय तरुणाच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला वाहकाने दुकानातून रुमाल आणायला सांगून उलटी साफ करायला लावले. हा प्रकार मंगळवारी (दि. 28 जून) दुपारी 12 वाजता डेक्कन येथे घडला. वाहकांकडून प्रवाशांना अशा प्रकारे मानसिक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी पीएमपीने वाहकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

प्रवासादरम्यान एखाद्याला उलटी झाली. त्यामुळे बस घाण झाली तर डेपोमध्ये नेऊन स्वच्छ करून घेतली जाते. प्रवाशांना बस साफ करण्यास भाग पाडले असेल तर हे चुकीचे आहे. संबंधित घटनेची माहिती घेऊन वाहक आणि चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल.

                                       – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Back to top button