हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही : उपमुख्यमंत्री पवार | पुढारी

हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही : उपमुख्यमंत्री पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आम्ही हातामध्ये गंडा, कंडा घालत नाही, काही जण अजूनही अशा अंधश्रद्धा अशा बाबींना बळी पडत आहेत. असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी आज (दि.२०) येथे व्यक्त केले. विधानभवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, राज्यासह देशात आपल्याला अनेक भोंदूगिरी बाबा दिसतात. नागरिक त्याला बळी पडत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. चुकीच्या प्रकारे कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही.

स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर यांच्या बरोबर चर्चा करून जादुटोणा कायदा लागू केला. आम्ही हातामध्ये गंडा, कंडा कधी घालत नाही. अशाप्रकारच्या जादूटोण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्या तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

रूग्ण संख्या कमी होतेय

पुण्यात कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीची माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तसंच लसीकरण जास्ती जास्त करण्याचा प्रयत्न आहे. लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. पहिले दोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोसचं पाहू असंही अजित पवार म्हणाले. गेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण झाले, अशी माहितीसुद्धा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जागतिक स्तरावर माहिती घेतली तर ५ ते ६ लाख दररोज रुग्ण आढळत आहेत.

तिसऱ्या लाटेचे धोक्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेतोय. चार आठवड्यात रूग्णसंख्या कमी होताना दिसतेय.

तिसऱ्या लाटेचा धोका पाहता काळजी घेतली जात आहे. आवश्यक ती तयारी केली जात आहे.

Back to top button