पुणे; पुढारी वृत्तसेवा : साहेब…, माझी गाडी नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटांसाठी रस्त्यालगत गाडीवरच थांबलेलो आहे, मी गाडी पार्किंग केलेलीच नाही, मी लगेचच येथून जातो, कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असताना देखील टोईंग व्हॅन वर कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले. ही घटना (गुरूवार) पावणे-पाचच्या सुमारास घडली. वाहतूक पोलिसांची तालिबानी पाहून भारतात लोकशाही आहे की, तालीबानी कारभार, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.
वाहतूक पोलिसांची तालिबानी पध्दतीने चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्या चाकरमान्या दुचाकीस्वारांना अडवण्याचे प्रकार सुरू आहेत. काही न काही कारणे सांगून वाहने अडविणे, त्यांच्याकडून वसुली करणे, हे प्रकार शहरात सर्रासपणे घडत आहेत.
असे असताना गुरूवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन ने गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टेम्पोत भरले.
यावेळी वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्किंगमध्ये असल्याचा दावा. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसांनी करणे, तरी कुठपतं योग्य आहे.
अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि त्याच्या मेंदूला मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो. तसेच, अशा मुजोर पोलिसांवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि वाहतूक पोलिस उपायुक्त राहूल श्रीरामे काय कारवाई करणार? हे आता पहावे लागणार आहे.
सायंकाळी सातच्या सुमारास संत कबीर चौकापासून वाहतूक पोलिसांची गाडी वाहतूकीला अडथळा ठरणार्या नो-पार्किंगमध्ये पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करत येत होती. यावेळी दै. 'पुढारी'चा प्रतिनिधी, छायाचित्रकार देखील यावेळी या टोईंग व्हॅनच्याच मागे होते.
गाडी चौकातून पुढे निघाली. यावेळी त्यांना रस्त्यालगत गाडीवर बसलेला दुचाकीस्वार नजरेस पडला. त्यावेळी पोलिसांनी त्याला त्याच्या दुचाकीसह टोईंग व्हॅनमध्ये भरला. यावेळी समोर सुरू असलेल्या घटनेचे चित्रीकरण करत असलेले छायाचित्रकार आणि बातमीदार यांनाही या वाहतूक पोलिसाने अरेरावी केली.
तसेच, पुराणिक साहेबांचा दम देत, चौकीवर या असे म्हणाले.
नानापेठ भागात वाहतूक पोलिसांकडून हा त्रास आमच्यासारख्या या परिसरातील सामान्य नागरिकांना कायमच होत आहे. आमच्या दुकानासमोरून गाडी उचलतात आणि पुढे जाऊन काय देणं, घेण करून लगेच सोडून देतात. याकडे कृपया लक्ष द्यावे. आम्हाला या दरोडेखोरांपासून प्रशासनाने वाचवावे.
– अभिजीत ढवळे, प्रत्यक्षदर्शी स्थानिक नागरिक
नाना पेठ परिसरात पोलिस कर्मचार्याकडून घडलेल्या या प्रकरणाबाबत मला माहित नाही. येथील अधिकारी पुराणिक आहेत. त्यांच्याकडून याची माहिती घेतो. तसेच, तात्काळ संबंधित कर्मचार्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– राहूल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग
पहा व्हिडिओ : पुणे वाहतूक पोलिसांची सामान्यांवर मुजोरी