मोदीभक्त मयूर मुंडे यांचे मोदींची मूर्ती हटवण्यावर वकिलामार्फत स्पष्टीकरण | पुढारी

मोदीभक्त मयूर मुंडे यांचे मोदींची मूर्ती हटवण्यावर वकिलामार्फत स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर मोदीभक्त मयूर मुंडे यांनी पुण्यातील औंध भागात उभारले होते. पण, काही दिवसातच या मंदिरातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची मूर्ती हटवण्यात आली. ही मूर्ती का हटवण्यात आली याबाबत मोदीभक्त मयूर मुंडे यांनी आपले वकील अॅड. मधुकर मुसळे यांच्यामार्फत स्पष्टीकरण दिले.

‘जिवंत व्यक्तीचे मंदिर बांधणे पक्ष शिस्तीत बसत नाही. त्यामुळे हे मंदिर तात्काळ हटवा अशी सूचना आम्हाला वरिष्ठांनी केली. त्यानुसार आम्ही मंदिरातील मोदींची मूर्ती काढली आहे. कोणी टीका केली म्हणून आम्ही मूर्ती काढली नाही.’ असे स्पष्टीकरण मोदीभक्त मयूर मुंडे यांचे वकील अ‍ॅड मधुकर मुसळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे.

मुख्य रस्त्याजवळच मोदींचे मंदिर

औंध येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मुंडे यांनी मुख्य रस्त्याच्या कडेलाच मंदिर उभारणी केली होती. औंध येथील अ‍ॅड. मुसळे हे भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांचे हे पती आहेत. सदर मंदिर हे मुंडे यांनी बांधले असले तरी, पडद्यामागे अ‍ॅड. मुसळे हेच असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंडे व अ‍ॅड. मुसळे यांनी पत्रकार परिषद घेऊन, टीका झाली म्हणून मंदिर हटवले नसल्याचे सांगून वरिष्ठांनी आदेश दिले म्हणून मोदींची मूर्ती काढली असल्याचे सांगितले. दरम्यान ही मूर्ती नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आली असल्याचेही मुसळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

गायब मूर्तीचा ठावठिकाणा लागला

मुंडे यांचा वकील म्हणून बाजू मांडताना अ‍ॅड. मुसळे यांनी, पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. म्हणून ती मूर्ती यापुढेही आमच्या कार्यालयात राहणार असल्याचे सांगितले.

‘आम्हाला पंतप्रधान कार्यालयातून मंदिर अथवा मूर्ती हटविण्याबाबत कोणताही फोन आला की नाही, याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही.’ असे एकच उत्तर यावेळी मोदीभक्त मयूर मुंडे यांनी वारंवार दिले. आम्ही नेत्यांचे ऐकलं म्हणून मूर्ती काढली असे सांगितले, पण तो नेता कोण याचे उत्तर मुंडे अथवा मुसळे यांनी शेवटपर्यंत दिले नाही.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची फोनाफोनी

 

Back to top button