कुठेही जा, रेल्वेचे बुकिंग सप्टेंबरपर्यंत फुल्ल; पुण्यातून रोज 180 गाड्या | पुढारी

कुठेही जा, रेल्वेचे बुकिंग सप्टेंबरपर्यंत फुल्ल; पुण्यातून रोज 180 गाड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शाळा सुरू झाल्या की रेल्वेप्रवासादरम्यान तितकी गर्दी नसते. मात्र, दोन वर्षांनंतर कोरोना ओसरल्याने पुन्हा रेल्वे स्टेशन गर्दीने फुलली आहेत. विशेषत: पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांनी आपले बुकिंग अगोदरच करून ठेवले असल्याने पुण्यातून देशभरात कुठेही जायचे असेल, तर रेल्वेच्या जवळपास सर्वच गाड्या सप्टेंबरपर्यंत फुल्ल राहणार असल्याचे दिसून येत आहे. पुणे स्टेशनहून सध्या दररोज 180 रेल्वे गाड्या ये-जा करीत आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनचा विकास

पुणे रेल्वे स्टेशन 1858 मध्ये इंग्रजांनी सुरू केले.
पलासदरी ते खंडाळा जोडणारा भोर घाटाचा उतार
1862 मध्ये पूर्ण झाला, ज्यामुळे मुंबई-पुणे जोडले गेले.
सध्याची पुणे रेल्वे स्टेशनची इमारत 1925 मध्ये बांधली होती.
इंग्रज वास्तुविशारद जेम्स बर्कले यांनी या वास्तूचे डिझाइन केले असून, ती वारसा हक्क यादीत समाविष्ट आहे.
या स्थानकात स्कायवॉकसह तीन फुटब्रिज आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी वेटिंग हॉल, वसतिगृहे, सेवानिवृत्त खोल्या, क्लॉक रूम, बुक स्टॉल, हेल्थ किऑस्क, पे अँड युज टॉयलेट, एसबीआय क्रेडिट कार्ड किऑस्क, एटीएम, वॉटर व्हेंडिंग मशिन,
पे अँड पार्क आणि इतर अनेक सुविधांचा समावेश आहे.

उत्तर व दक्षिण भारतात प्रवास वाढला
कोरोनाची लाट ओसरल्यापासून पुणे शहरातून पर्यटनाला जाणार्‍यांची संख्या तिपटीने वाढली आहे. सर्वाधिक बुकिंग दक्षिण भारतात जाण्यासाठी होत असून, तिरुपती, कोडाई कॅनॉल, पद्मनाभ मंदिर, तिरुचिरापल्ली, कन्याकुमारीकडे जाणार्‍या रेल्वेचे बुकिंग सर्वाधिक आहे. या मार्गांवरील बुकिंग सप्टेंबरपर्यंत फुल्ल आहे, तर उत्तर भारतात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाखपर्यंत पर्यटकांनी बुकिंग केले असून, वाराणसीला जाणार्‍या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. काशिविश्वेश्वराचे नवे मंदिर पाहण्यासाठी येणार्‍या भाविकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे उत्तर भारतात पुण्यातून सप्टेंबरपर्यंत हाऊसफुल्ल आहेत.

प्लॅटफॉर्म – 06
ट्रॅक – 8 लाइन – 2
बांधकाम – 164 वर्षांपूर्वी

पुनर्निर्माण -27 जुलै 1925 (96 वर्षे)
रोजचे प्रवासी – सुमारे दीड लाख
रोजच्या गाड्यांची संख्या – सुमारे 180

Back to top button