आ. संजय जगताप यांनी केली सासवड पालखी तळाची पहाणी | पुढारी

आ. संजय जगताप यांनी केली सासवड पालखी तळाची पहाणी

नारायणपूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी २४ जून रोजी त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराज यांच्या सासवड नगरीत विसावणार आहे. यानिमित्ताने गुरुवारी २३ जून रोजी पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पालखी तळावरील तयारीचा आढावा घेतला.

सासवडला माऊलींची पालखी शुक्रवार आणि शनिवारी मुक्कामी येणार आहे. या सोहळा काळात पालखी तळावर विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, आपत्कालीन व्यवस्थेबाबत संबंधित अधिकारी यांना आमदार संजय जगताप यांनी सूचना केल्या. या वेळी तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, महावितरणचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेंद्र पाटील, पालिका आरोग्यप्रमुख मोहन चव्हाण, पालिका पाणीपुरवठा अभियंता रामानंद कळसकर, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदी उपस्थित होते

पालखी तळावर मुरमीकरण, खड्डे, ड्रेनेज, गटारे दुरुस्ती केली आहेत. पावसामुळे ड्रेनेज, गटारे तुंबणार नाहीत, याची खबरदारी घेतली आहे. या परिसरात १ हजार मुव्हींग टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. पालखी सोहळ्यात नगरपालिकेचे १५० कर्मचारी व वाघिरे महाविद्यालयातील एनसीसीच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच तळावर पाण्याचे १० कोंढाळे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिली. या वेळी यशवंतकाका जगताप, संजय ग. जगताप, अजित जगताप, विजय वढणे, सुहास लांडगे, मोहन जगताप, दीपक टकले, बाळासाहेब पायगुडे आदी उपस्थित होते.

 

Back to top button