पुणे, पुढारी वृत्तसेवा: वाहतूक पोलिस म्हणजे कोपर्यात उभे राहून अचानक पडणारी टोळधाड, असा अनुभव पुणेकरांना रोज येत असताना वरिष्ठ अधिकार्यांनी अशा प्रकारच्या वाहतूक नियमनाची चांगलीच दखल घेतली आहे. या पोलिसांना आता फक्त वाहतूक नियमन करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर विशेष शाखेचा छुपा वॉच चौकाचौकांत असणार आहे. त्यामुळे कारवाई करताना किंवा काही गैर आढळल्यास निलंबनाची व थेट गुन्हा दाखल करण्याची टांगती तलवार वाहतूक नियमन करणार्या पोलिसांवर असणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे वाहतूक कोंडी जाणवत नव्हती. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता पुण्यातील वाहतूक प्रश्न गंभीर होत चालला आहे.
पुणेकर रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. पुणेकरांनी अशा वारंवारच्या कारवाईचा संतापदेखील प्रत्यक्ष व समाजमाध्यमातून व्यक्त केला होता. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. एकीकडे एखाद्या चौकात वाहतूक कोंडी असताना पोलिस त्या चौकाच्या पुढेच उभे राहत. ते तितक्या गांभीर्याने वाहतूक कोंडी दूर करीत नव्हते.
पण, दुसरीकडे वाहतूक पोलिस नेमप्लेट झाकून कारवाईसाठी चौकांच्या कोपर्यांमध्ये उभे राहून दंडवसुली अन् पावत्या गोळा करीत होते. त्यामुळे नागरिकांशी हुज्जतीचे प्रकारदेखील वाढले होते. मात्र, आता अतिवरिष्ठ अधिकार्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत केवळ वाहतूक नियमनावरच भर देण्याची सूचना केली आहे. या सर्व कारवाईच्या बडग्यानंतर वाहतूक पोलिसांकडील 'पॉस' मशिनही जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टोइंग वाहनांवर खासगी व्यक्ती कार्यरत आहेत. वाहने उचलणे एवढेच काम असलेल्या या कर्मचार्यांचा आविर्भाव वेगळा असल्याचे दिसून येते. तसेच, या वाहनांवरील सीसीटीव्हीदेखील बंद आहेत. टोइंग व्हॅनने नागरिकाला त्याच्या दुचाकीसह उचलून टोइंग व्हॅनवर ठेवल्यानंतर दै. 'पुढारी'ने 'वाहतूक पोलिसांचा तालिबानी कारभार' अशा मथळ्याची बातमी छापून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त तसेच सह पोलिस आयुक्त यांनी वाहतूक विभागाची बैठक घेत कानउघाडणी केली आहे. तसेच, प्रभारी अधिकार्यांना तंबी देत ट्रॅफिक व्यवस्थापन व्यवस्थित करण्याबाबत सूचना दिल्या. या पुढील कोणत्याही कारवाईला व गैरप्रकाराला कर्मचारी व संबंधित अधिकारी जबाबदार असतील, अशी कानउघाडणी केली आहे.
हेही वाचा