पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'देहभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही,' असे प्रतिपादन शिवचरित्रकार व श्रीदत्त उपासक धर्मभास्कर परमपूज्य सद्गुरुदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख यांनी केले. जागर भक्ती-शक्तीचा एंटरप्राइजेस, स्वरप्रभा फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्हीनस स्पिरिच्युअल अँड हीलिंग कम्युनिटी ट्रस्ट, दुबईस्थित बिलिओ एफएक्स यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती आणि शक्तीला जोडणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कवयित्री डॉ. संगीता बर्वे, अल्बमचे निर्माते कवी-गीतकार मंगेश निरवणे, शिरीष काकडे, अरुण बाभुळगावकर, उमेश कुलकर्णी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शेखर मुंदडा, लेखक-दुर्ग अभ्यासक संदीप तापकीर यांसह मान्यवर उपस्थित होते. सद्गुरुदास महाराज म्हणाले, 'शक्ती आणि भक्तीचा संगम जगात फक्त महाराष्ट्रातच झाला आहे.
जगाला शिवाजी महाराज खूप कळायचे आहेत. त्यांना समजणे एवढे सोपे नाही. त्यांना समजण्यासाठी डोळस दृष्टी हवी. महाराज दुर्गपती होते; म्हणून ते छत्रपती होऊ शकले. शिवाजी महाराज आभाळासारखे मोठे होते. हजारो वर्षांतून एखादाच युगपुरुष निर्माण होतो. तो युगपुरुष महाराज होते.' यावेळी मंगेश निरवणे, डॉ. संगीता बर्वे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले. संदीप तापकीर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.
हेही वाचा