धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळयाचे आमदार फारूक शाह यांची संजय गांधी निराधार योजनेच्या समितीवर अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी आगामी काळात गरीब व गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचवा असे आवाहन केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेची समिती गठीत झाल्याने सर्व सामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. धुळे शहरात विविध शासकीय समित्या गठीत करून कार्यान्वित होण्याच्या बाकी होत्या. सुमारे अडीच वर्ष होऊन गेले असून सुद्धा समित्यांची पुनर्रचना करण्यात आलेली नव्हती. यामुळे धुळे शहर विधानसभा मतदार संघातील नागरिकांना शासनाच्या विविध लाभाच्या योजनेंपासून वंचित राहावे लागत होते. या सर्व समित्या गठीत करून कार्यान्वित करण्यासाठी व जनतेला फायदा पोहचविण्यासाठी धुळे शहराचे आमदार फारूक शाह हे प्रयत्नशील होते. त्यात आज त्यांच्या प्रयत्नातून शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी आमदार फारूक शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यात संजय गांधी निराधार योजनेत प्रामुख्याने आमदार फारूक अन्वर शाह हे (अध्यक्ष), डॉ. दीपश्री नाईक (सदस्या), प्रफुल्ल पाटील (सदस्य), अब्बास शाह सुलेमान शाह (सदस्य), शफी शाह गनी शाह (सदस्य) यांची या प्रमाणे अनुक्रमे निवड करण्यात आली आहे. सदरची समिती गठीत झाल्याने नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार फारूक शाह यांची भेट घेत त्यांचे आभार मानले.या प्रसंगी आमदार फारूक शाह यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. आगामी काळात गरीब गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्याचे आवाहन आमदार फारूक शाह यांनी केले असून महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.