सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; एक ठार, पाचजण गंभीर | पुढारी

सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; एक ठार, पाचजण गंभीर

मोहोळ,पुढारी वृत्तसेवा: सोलापूर- पुणे महामार्गावर अपघात झाला असून टेम्पोला रिक्षाने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक ठार झाला.

या अपघातात अन्य पाचजण गंभीर जखमी झाले. हा अपघात १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता मोहोळ तालुक्यातील हिवरे गावच्या शिवारात घडला.

बालाजी ओमाने (रा. लोणी काळभोर, पुणे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून माधुरी सोमनाथ लष्कर (वय २८), सोमनाथ बाबुराव लष्कर (३५),

लता बाबुराव लष्कर (४५), बाबुराव दुर्गा लष्कर (५४), हर्ष सोमनाथ लष्कर हा दीड वर्षीय बालक जखमी झाला आहे.

हे सर्व लोणी काळभोरचे राहणारे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लोणी काळभोर पुणे येथील लष्कर कुटुंबीय १५ ऑगस्ट रोजी नातवाचे जावळ काढण्यासाठी रिक्षाने सोलापूर-पुणे महामार्गाने तुळजापूर कडे निघाले होते.

दुपारी साडेबारा वाजता त्यांची रिक्षा (क्र. एम.एच. १२ के.आर. ०९५३) मोहोळ तालुक्यातील हिवरे गावच्या शिवारात आली होती.

यावेळी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची रिक्षा महामार्गाने सोलापूरच्या दिशेने निघालेल्या टाटा टेम्पोच्या (क्र. टी.एन. ८७ बी. ५३५५) पाठीमागील बाजूवर आदळली.

त्यामुळे भीषण अपघात होऊन रिक्षा मधील सर्वच्या सर्व गंभीर जखमी झाले.

यावेळी टेम्पो चालक नानाभाऊ धर्मा पाखरे (रा. मोरे वस्ती कुरुळी ता. खेड, पुणे) याने सावळेश्वर टोल नाक्याच्या रुग्णवाहिका बोलावून घेतली.

जखमींवर उपचार सुरू

त्यानंतर जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वाटेतच उपचारापूर्वी रिक्षाचालक बालाजी ओमाने याचा मृत्यू झाला.
सोलापूर- पुणे महामार्गावर अपघात.

तर उर्वरित पाच जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी माधुरी लष्कर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. ऐन स्वातंत्र्य दिनी घडलेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button