महर्षीनगरपावसाळा तोंडावर येऊन ठेपला; तरीही नाले सफाईची गती ढिम्मच! | पुढारी

महर्षीनगरपावसाळा तोंडावर येऊन ठेपला; तरीही नाले सफाईची गती ढिम्मच!

महर्षीनगर : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू होऊनही महर्षीनगर परिसरातील दोन्हीही मुख्य नाल्यांची सफाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाल्यांतील राडारोड्यासह कचरा तसाच पडून असून, एखादा मोठा पाऊस झाला तर त्या प्रवाहाला अडथळा येऊन पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही नालेसफाई कधी होणार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 7.5 किलोमीटर अंतराचे नाले आहेत. मुकुंदनगर आणि महर्षीनगरच्या दोन्ही भागांतील नालेसफाई अद्यापही झालेली नाही. मुकुंदनगरमध्ये हा नाला बिबवेवाडी मार्गे ऋतुराज सोसायटी, प्रेमनगर, महर्षीनगर, मुकुंदनगरमधून जातो, या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. तसेच त्यात थर्मोकोल तुकडे, खराब गादी, कपड्याचे ढीग, तुटलेले वस्तू यांचा कचरा पडून आहे. परिणामी पहिला पाऊस होताच येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला त्याचा अडथळा होण्याची शक्यता आहे. गतवर्षी येथील नाल्याकडील चाळीमध्ये पावसाचे पाणी घुसलेले होते. अनेकांच्या घराचे नुकसान झालेले होते. त्यापासून काहीही धडा न घेता प्रशासनाकडून नालेसफाईबाबत ढिलाई सुरू आहे.

ड्रेनेजसोबत नाल्याची सफाईची आवश्यक असून, याबाबत महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. अधिकार्‍यांना वारंवार संपर्क केल्यावरही प्रतिसाद मिळत नाही. गेल्या वर्षी नागरिकांच्या घरात पाणी घुसलेले होते. नालेसफाई योग्यरीत्या झाली पाहिजे तरच धोके टळतील.
प्रवीण चोरबेले, माजी नगरसेवक

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत महर्षीनगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड परिसरातील नाले शेवटच्या टप्प्यात आहेत. उर्वरित नालेसफाई तत्काळ करून घेण्यात येणार आहे.
दीपक सोनवणे, कनिष्ठ अभियंता,
भवन विभाग, महापालिका

 

Back to top button