केवळ तीस सेकंदांतच होणार जमिनीची मोजणी  | पुढारी

केवळ तीस सेकंदांतच होणार जमिनीची मोजणी 

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जमिनीची 30 सेकंदांत अचूक मोजणी करणारे रोव्हर (यंत्र) खरेदी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला. पुणे जिल्हासाठी दहा रोव्हर उपलब्ध होणार असून, त्यासाठी 98 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जमीन मोजणी गतीने होणार  आहे. तसेच प्रलंबित मोजणी अर्जांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. याबरोबरच  जिल्ह्यात चार ठिकाणी मोजणी स्थानके उभारण्यात आली आहेत.
जमिनीची अचूक आणि कमी वेळेत मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने स्थानके (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन – कॉर्स) उभारली आहेत. या स्थानकांच्या आधारे जीपीएस मोजणी केवळ 30 सेकंदात घेता  येणार आहे. या स्थानकांमधून होणारी मोजणी रोव्हरमध्ये संकलित होणार असून, पडद्यावर (टॅब) हे आकडे दिसणार आहेत, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

चार तालुक्यांत मोजणी स्थानके

पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, दौंड आणि पुरंदर या चार तालुक्यांत  ही मोजणी (कॉर्स) स्थानके उभारण्यात येणार आहेत. एका स्थानकामुळे 35 किलोमीटरच्या त्रिज्येच्या क्षेत्रात जीपीएस रीडिंग घेणे शक्य होणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हरमध्ये संकलित होणार असून, हे आकडे पडद्यावर टॅबमध्ये दिसणार आहेत. स्थानकांचे काम जवळपास पूर्णत्वाला आले असून मोजणी यंत्र खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा

Back to top button