नाशिक : रस्त्याने पायी चाललेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांना घेतले ताब्यात | पुढारी

नाशिक : रस्त्याने पायी चाललेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांना घेतले ताब्यात

नाशिक : (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मैत्रिणीसोबत रस्त्याने पायी चाललेल्या अल्पवयीन मुलीचा तिघा संशयितांनी विनयभंग केल्याची घटना म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात तिघा संशयितांवर विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून काही तासांतच दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. एकजण अद्याप फरार असून, त्यालाही लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

म्हसरूळ परिसरातून मंगळवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी मैत्रिणीसोबत पायी चालली होती.
त्यावेळी अचानक पीडितेच्या भावाच्या ओळखीचा एक जण त्याच्या अन्य दोन मित्रांसोबत तेथे आला व पीडितेला थांबवले. ‘तू कोठे चाललीय’, असे विचारत ‘तू खुप छान दिसते, ओठांना एवढी लिपस्टिक का लावतेस, तू तुझा हात आमच्या हातात का देत नाहीस, असे म्हणून त्याने व अन्य एकाने पीडितेचे दोन्ही हात पकडले. त्यामुळे संतापलेल्या पिडितेने दोघांचे हात झटकून ‘थांबा, मी माझ्या भावालाच बोलाविते, असे सुनावले. मात्र तरीही संशयिताने ‘जा तुला कोणाला बोलवायचे त्याला बोलव, आम्ही कोणाला घाबरत नाही, असा दम दिला. यावर पिडितेने थेट म्हसरूळ पोलीस ठाणे गाठत घडलेली हकीगत पोलिसांकडे कथन केली. त्यानुसार पोलिसांनी फिर्याद घेत तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या आदेशान्वये पोलिस उपनिरिक्षक चतुर यांच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच तिघांपैकी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित एका संशयिताचा शोध सुरू असून, लवकरच त्यालाही ताब्यात घेतले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button