गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला, भोंग्यांच्या मुद्यावर चर्चा? | पुढारी

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील शरद पवारांच्या भेटीला, भोंग्यांच्या मुद्यावर चर्चा?

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भोंग्यांच्या मुद्यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.

सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी नियम तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मनसेला रोखण्यासाठीच राज्य सरकारने हे पाऊल टाकल्याचे समजते. दुसरीकडे मशिदींच्या शंभर मीटर परिघात भोंगे लावण्यासाठी पूर्वपरवानगी न घेतल्यास सरळ तुरुंगवासाची तरतूद करणारा नियम लागू करण्यात आला आहे. राज्यभरात मनसेला रोखण्यासाठी हाच नाशिक पॅटर्न वापरला जाईल, असे स्पष्ट संकेत आहेत.

मनसेने दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे– पाटील यांनी सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोमवारी हा निर्णय जाहीर केला. वळसे-पाटील म्हणाले, प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून निर्णय घेतील. ते नियमावली तयार करतील ती राज्याला लागू केली जाईल. राज्यासाठी अधिसूचना काढली जाईल आणि ही नियमावली लागू करण्यात येईल. हे नियम तोडणार्‍याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोणत्याही मशिदीच्या शंभर मीटर परिसरात नवा भोंगा लावण्यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, असा कडक नियम नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सोमवारी लागू केला होता. त्यापाठोपाठ नवी नियमावली करण्याची घोषणा वळसे-पाटील यांनी केली. भोंग्यांच्या संदर्भात येऊ घातलेली नियमावली ही नाशिक पॅटर्नची असेल, असे स्पष्ट संकेत यावरून मिळतात. नियमानुसार सर्वच धार्मिक स्थळांच्या पदाधिकार्‍यांना भोंग्याबाबतच्या परवानगीसाठी लिखित स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकष व आदेशानुसारच सर्व धार्मिक स्थळांना परवानगी देण्यात येणार आहे.

 हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला पाहुया कशी आहे मायानगरी मुंबई ? | Mumbai Darshan |

Back to top button