सोलापूर : चिंता वाढली, कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी ८ मृत्यू | पुढारी

सोलापूर : चिंता वाढली, कोरोनाने सलग दुसर्‍या दिवशी ८ मृत्यू

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये सलग दुसर्‍या दिवशी आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागामध्ये मृत्यूची संख्या वाढत असून बाधितांची संख्याही वाढत आहे.

आज आलेल्या आकडेवारीमध्ये 653 नव्या बाधितांची नोंद झाली. शहरामध्ये केवळ 12 बाधितांची नोंद झाल्यामुळे शहरामध्ये दिलासादायक चित्र आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी जुलै महिन्यामध्ये तीनशे ते चारशेच्या घरामध्ये होती. आता यामध्ये वाढ होत बाधितांची संख्या साडेसहाशेच्या घरामध्ये गेली आहे.

करमाळा तालुक्यामध्ये 95, माढा 93, माळशिरस 124, पंढरपूर 152, सांगोला 57, मोहोळ 55, बार्शी तालुक्यामध्ये 39, मंगळवेढामध्ये 20 नव्या बाधितांची नोंद झाली. अक्‍कलकोट तीन, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये केवळ एक, दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये दोन नव्या बाधितांची नोंद झाली.

पंढरपूर आणि सांगोला तालुक्यामध्ये वाढणारा कोरोना आता करमाळा आणि माढा तालुक्यामध्येही अधिक पसरू लागला आहे. ग्रामीण भागातील आठजणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जिल्ह्यातील 11 हजार 149 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 10 हजार 508 जणांचे रिपोेर्ट हे निगेटिव्ह आले, तर 641 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले.

उपचार घेऊन बरे झालेल्या 241 जणांना घरी सोडण्यात आले. उपचार घेऊन बरे झालेल्यांपेक्षा बाधितांची संख्या जवळपास तिप्पट आहे. तीन हजार 955 बाधितांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत.

शहरामध्ये कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नाही. 12 नव्या बाधितांची नोंद झाली. 834 जणांच्या तपासणीमध्ये 12 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह, तर 822 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 89 बाधितांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू असून उपचार घेऊन बरे झालेल्या 18 जणांना घरी पाठवण्यात आले आहे.

Back to top button