तळीये दुर्घटना ग्राऊंड रिपोर्ट : ‘गावकऱ्यांचा आक्रोश तुला ऐकू आला नाही का रे!’ | पुढारी

तळीये दुर्घटना ग्राऊंड रिपोर्ट : 'गावकऱ्यांचा आक्रोश तुला ऐकू आला नाही का रे!'

भाग्यश्री प्रधान आचार्य

‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन नुस्त लढ म्हणा’ या कुसुमाग्रज यांच्या कवितेने माझ्या काळजाचा ठाव घेतला. निमित्त होतं रायगड दौऱ्याचं.

सोमवारी दुपारी पुढारी कार्यालातून ठाणे आणि रायगडचे निवासी संपादक शशिकांत सावंत यांनी मला महाडला जायला सांगितले. त्यामुळे निघण्यासाठी तयारी करण्याची सूचना दिली. त्याचवेळी अलिबागचे सहनिवासी संपादक जयंत धुळप यांनी आपली महाडला जाण्याची सोय केली असून मंगळवारी सकाळी ७ ला निघू असे सांगितले. त्याप्रमाणे आदल्यादिवशी अलिबागला पोहोचले. आणि अनेकांना संपर्क साधून नेमकी महाडची काय परिस्थिती आहे तो अंदाज घेतला.

पूरपरिस्थिती कव्हर करणं हा माझा दहा वर्षांच्या करिअरमधील पहिलाच अनुभव. त्यामुळे नेमकी काय परिस्थिती असेल. काय कव्हर करायचं आहे हे ठरवूनच मी घरातून बाहेर पडले होते. मात्र तोपर्यंत माझ्या मनाला मी म्हटलं तसं कुसुमग्राजांच्या ‘कणा’ या कवितेची सतत आठवण होत होती.

मांडगाव येथे पोहोचल्यानंतर जयंत धुळप यांनी पहिले तळीये येथे राज्यपाल येणार असल्याने तेथे आधी जाऊ अस सांगितले. त्याचवेळी माझ्या मनात नेमक तिथे कोणाला प्रश्न विचारायचे, कोणी बोलण्याच्या मनःस्थितीत असेल का, लाईव्ह करण्यासाठी रेंज असेल का, राज्यपाल भेटतील का, आपल्या नजरेतून एकही गोष्ट सुटायला नको, असे एक ना अनेक प्रश्न सतावत होते.

तेथील परिस्थिती कशी असेल याचं मनावर थोड दडपण होतं. एक हात मदतीचा असे आव्हान करणाऱ्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. इतकेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मदतीसाठी लोटला होता. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी त्या रस्त्यावर झाली होती. अखेर वाहतूक कोंडीमुळे राज्यपालांची भेट होऊ शकली नाही. थोडी निराश झाले पण अखेर तळियेत पोहचले.

गावाच्या वेशीवर गावातील ग्रामस्थ उभे होते. दुरुन येणाऱ्या नातेवाईकांचा ओघ सुरू होता. त्या नातेवाईकांना वेशीवर उभे राहून हे ग्रामस्थ दिलासा देत होते. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. तळीये मधली वाडी हा फलक नजरेस पडला आणि एक मोठा श्वास घेऊन शांत नजरेनं आजूबाजूला पहिलं.

आजूबाजूला ग्रामस्थ आणि बाहेरून आलेल्या पाहुण्यांची वर्दळ दिसली. गाडीतून खाली उतरल्यावर समोर दिसली तळीये गावाची शाळा. दुर्घटना झाली त्या ठिकाणाहून काही अंतरावर शाळेची पहिलीच इमारत होती. या शाळेत वारस हक्काची नोंद, आलेल्या नातेवाईकांची भेट घडवून देणे, जे निराधार आहेत त्यांच्या राहण्याची सोय करणे अशी कामे केली जात होती.

ही शाळा जणू काही नातेवाईकांच्या आठवणीची साक्षीदार बनली होती. वाचलेल्यांपैकी अक्षदा कोंढाळकर तिची आई आणि छोटा नऊ वर्षांचा भाऊ समोर आला. काय झालं, काय वाटतं हे प्रश्न माझ्या कामाचा भाग. मात्र त्यादिवशी हे प्रश्न विचारायची हिंमतच होत नव्हती. तरीही धीर एकवटून अखेर अक्षदला विचारलं आणि तिने सांगितलेली कहाणी ऐकल्यानंतर केवळ तुमचा जीव वाचला हेच खूप महत्वाचे आहे. असा धीर देऊन पुढे आले.

समोरच ज्याचं संपूर्ण कुटुंब या अपघातात गेलं तो जवान दिसला. त्यांनाही विचारलं काय झालं? पण तो प्रसंग घडला तेव्हा समोर नसल्याने माहित नाही असे त्यांनी सांगितले. पण ते बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते हे मला समजले. अश्रू थांबता थांबत नव्हते. मध्येच एखादी सर येऊन त्यांना पुन्हा आठवणीत भिजवत होती.

शाळेच्या बाहेर आल्यानंतर समोरच उजाड झालेला आणि अर्धा खचलेला डोंगर दिसला आणि मनात चर्र झालं. ज्या गावाला इतके वर्ष ज्याने सावली दिली तो इतका क्रूर का झाला असेल. नव्हे नव्हे आपणच त्याला क्रूर व्हायला भाग पाडलं वैगरे वैगरे गोष्टी मनात दाटून आल्या.

त्यानंतर ज्या ठिकाणी घटना घडली तिथे प्रत्यक्ष पाहणी केली. केवळ मातीचा खच, अर्धवट तुटलेली घरे, डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह डोळ्यांना दिसत होता. बचावकार्य थांबवले होते.

पुढे चालत गेल्यानंतर गुडघ्यापर्यंत चिखल असल्यामुळे पाय मातीत रुतत होते. तिथेच एक दगड शोधला आणि त्याच्यावर भर देऊन जयंत धुळप यांच्यासोबत एक लाईव्ह केलं.

लाईव्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा डोंगराकडे शांतपणे पाहिलं आणि मनात आलं ‘आरे डोंगरा, बाबा का वागलास असा? तुझ्यातला काही भाग तू सोडून दिलास तेव्हा तुला दुखापत, दुःख, वेदना नाही झाल्या का रे, तुला घट्ट पकडून बसलेले दगड, माती खाली पडताना त्यांनी दिलेली आरोळी, गावकऱ्यांचा आक्रोश तुला ऐकू आला नाही का रे, इतकं सगळ झाल्यावरही आहे तशा अवस्थेत तू दिमाखात उभा आहेस. कसं जमत रे तुला हे’ या प्रश्नाने मनात काहूर माजले.

हसतं खेळतं गाव मात्र चिडीचूप झालं. तसचं मनही सुन्न झालं. डोळे अश्रूंनी भरून आले पण पुन्हा स्वतःला सावरत आपल्याला लढा द्यायचा आहे. पुन्हा निसर्गाच्या आणि येथील माणसांच्या व्यथा सगळ्यांसमोर मांडायच्या आहेत असे म्हणत अश्रू लपवले आणि पुढील प्रवासाला लागले.

पत्रकाराला मन नसतं का? काय झालं, कस झालं असे तुम्ही कसे विचारू शकता. असे अनेक जण विचारतात आम्हाला. पण तो एक आमच्या कार्याचा भाग असतो. शेवटी पत्रकार किंवा माध्यमात काम करणारा पण माणूस असतो आणि त्यालाही मन असतं. कुठे ते हळव होतं, कुठे धीर गंभीर होऊन लढा देतं, कधी निर्भिड होतं, तर कधी स्वतःला सावरत पुन्हा उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होतं.

Back to top button