सांगली : पूरग्रस्तांना मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणाले, तुम्ही काळजी करू नका | पुढारी

सांगली : पूरग्रस्तांना मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणाले, तुम्ही काळजी करू नका

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथे महापुरामुळे चार लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सांगली येथील पूरग्रस्‍त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. या वेळी पूरग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलासा दिला. ते म्हणाले, ‘तुम्ही अजिबात काळजी करू नका, यातून नक्की मार्ग काढला जाईल.’

येथे पूर आल्याने लोकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. भिलवडी येथील बाजारपेठेत ठाकरेंनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

ठाकरे म्हणाले…

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, आधीचं कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याचं क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीतील ४ लाख लोकांचे स्थलांतर केले.

जीवितहानी होऊ नये म्हणून प्रयत्न केला. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठेपर्यंत वाढला होता, ते दाखवले.

लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणार आहे.

किती नुकसान झाले आहे. त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच किती नुकसान झाले, याचा अंदाज घेणे सुरू आहे.

काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील. आपली त्याला तयारी हवी.

कारण दर वर्षी हे पुराचे संकट येणार आहे. आपण त्यातून उभे राहायला हवे, असेही ते म्‍हणाले.

पुन्हा दुसऱ्या वर्षी अशाच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. दर वर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही., अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे ते करणार. अशा संकटावेळी लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातील पैसा कुठे जातो ते कळत नाही.

मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :आधी कोरोना आणि आता महापुराने सगळा संसारचं उध्वस्त केला…

Back to top button