

पुणे; पांडुरंग सांडभोर : पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊनही भाजपला टक्कर देऊ शकणार आहेत.
गत पुणे महापालिका निवडणुकीत प्रत्येक पक्षाला मिळालेल्या एकूण जागा आणि मतांची टक्केवारी लक्षात घेता ही राजकीय समीकरणे जुळून येत आहेत.
महापालिका निवडणूका सहा महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढवितील असा तर्क लढविला जात होता, आता मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यामुळे त्याचा नक्की फटका कोणाला बसणार आणि कोणाला फायदा होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मात्र, काँग्रेसच्या या स्वबळामुळे राष्ट्रवादीला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्तता असली तर शिवसेना मात्र ही कमतरता भरून काढू शकते, असे गत महापालिका निवडणूकीतील निकालाच्या विश्लेषणावरून स्पष्ट होत आहे.
गत महापालिका निवडणुकीत भाजपने महापालिकेत 98 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत राष्ट्रवादीने 110 तर काँग्रेसने 100 जागा लढविल्या होत्या.
मात्र, जेमतेम 50 ते 55 जागांवर या दोन्ही पक्षात आघाडी झाली होती. त्याचा फटका दोन्ही काँग्रेसला झाला होता.
मतांची विभाजणी होऊन तब्बल 25 जागांवर भाजप विजयी झाली होती.
सर्वच्या सर्व जागावर आघाडी झाली असती तर भाजपला एकहात्ती सत्ता मिळविण्यासाठी झगडावे लागले असते असे निकालावरून स्पष्ट होत आहे.
महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मतांची एकत्र बेरीज केल्यास तब्बल 20 जागांवर भाजपपेक्षा अधिक मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.
त्यामुळे काँग्रेसने जरी स्वबळावर निवडणूक लढविली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपला टक्कर देऊ शकते असे चित्र आहे.
गत पालिका निवडणुकीत भाजपने 98 जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 36. 67 टक्के इतकी होती.
तर दुसर्या क्रमाकांवर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकून जवळपास 22 टक्के मते मिळाली होती. शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी 10 जागा जिंकल्या होत्या.
मात्र शिवसेनेच्या मतांची टक्केवारी 14.19 टक्के तर काँग्रेसची 9 टक्के इतकी होती.
त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांची एकत्रित टक्केवारी 36.19 म्हणजेच भाजपला मिळालेल्या मतांऐवढी होती.
जर महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविल्यास भाजपला खरी टक्कर देऊन पालिकेत सत्ता आणणे अधिक सोपे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
https://youtu.be/nmrJVXSz3TQ