पुणे : भुखंडाच्या श्रीखंडासाठी माजी खासदाराच्या निकटवर्तीयाची मध्यस्थी? : किरीट सोमय्या | पुढारी

पुणे : भुखंडाच्या श्रीखंडासाठी माजी खासदाराच्या निकटवर्तीयाची मध्यस्थी? : किरीट सोमय्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  खराडी येथील महापालिकेचा आरक्षित भुखंड बिल्डरांच्या घशात घालण्याच्या परवानगीच्या निर्णयाची चौकशीची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीबरोबरच सत्ताधारी भाजपचीही अडचण होण्याची शक्यता आहे. हा भुखंड बिल्डराला देण्यासाठी पुण्यातील भाजपच्या माजी खासदारांच्या निकटवर्तीयानीच मध्यस्थी करून पालिका प्रशासनावर दबाव आणल्याची जोरदार चर्चा आहे.

खराडी सर्व्हे.न. 53 व 54 येथील तब्बल 15 हजार 779 चौरस मीटरचा भुखंड आहे. या भुखंड अ‍ॅमिनिटी स्पेस म्हणून महापालिकेच्या ताब्यात आला असून तो एक्झिबिशन मैदानासाठी आरक्षित आहे. या भुखंडाचा मोबदला प्रशासनाने संबधित जागा मालकाला दिला असला तरी या जागेचा सातबारा मात्र महापालिकेच्या नावावर करण्याचा विसर प्रशासनाला पडला. त्यामुळे ही जागा संबधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेकडे परत घेण्याचा प्रस्ताव 2018 दिला होता. त्यावर महापालिका आणि राज्य शासन या दोघांनी नकारात्मक भुमिका घेतली होती.

मात्र, पुण्यातील भाजपच्या एका माजी खासदाराच्या निकटवर्तीयाने थेट महाविकास आघाडी सरकारमधील एका नेत्याचा दबाव आणून हा भुखंड बिल्डरला देण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे शासनाने सकारात्मक अभिप्राय देऊन तसे पत्र महापालिकेला पाठविले. त्यामुळे आता आयुक्तांनी तत्वता मान्यता दर्शविली. दरम्यान हे प्रकरण उघडकिस झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार सोमय्या यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या घोटाळ्याची चौकशी करून या निर्णयाला ताबडतोब स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता चौकशी नक्की कोणाची होणार आणि भुखडांचे श्रीखंड लाटण्यासाठी पडद्यामागून भुमिका वटविणार्‍यांचा पर्दाफाश होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चौकशीचे आश्वासन

खराडीत ऑक्सीजन पार्कच्या भुमिपुजनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येथील स्थानिक रहिवाशांनी भेट घेऊन हा भुखंड बिल्डरला देऊ नये अशा मागणीचे निवेदन दिले होते. त्यावर पवार यांनी याबाबत नगरविकास विभागाने घेतलेल्या या निर्णयाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

Back to top button