पुणे : पिसर्वे- माळशिरस गटात नवीन चेहऱ्यांना संधी? | पुढारी

पुणे : पिसर्वे- माळशिरस गटात नवीन चेहऱ्यांना संधी?

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद गटाची विभागणी होऊन पिसर्वे-माळशिरस गटाची निर्मिती जवळपास निश्चित झाली आहे. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प, बंद पाणी योजना, पुरंदर उपसाच्या पाण्याचे वाढते दर आणि कोट्यवधीची विकासकामे असे कळीचे मुद्दे डोळ्यासमोर आहेत. विकासकामांबरोबर अडचणींचादेखील डोंगर मतदारांनी पार केला आहे. यामुळे नवीन चेहऱ्यांना वाट सुकर असली तरी केलेली विकासकामे अन् बेरजेच्या राजकारणाचे गाठोडे बांधून बसलेले जुने खेळाडू रणांगणात उतरले आहेत. यामुळे नवीन गटाचे कारभारी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पूर्वीच्या माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादीचे माजी सदस्य सुदाम इंगळे यांचे दीर्घकाळ निर्विवाद वर्चस्व होते. गतवेळीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी त्यांचा पराभव करत त्यांचे वर्चस्व मोडीत काढले. विधानसभेच्या निवडणुकीपासून इंगळे व झुरंगे विविध कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर दिसून आले आहेत. यामुळे इंगळे आणि झुरंगे यांचे सूत जुळले असल्याचे बोलले जाते.

 राजकीय सोय की योगायोग

पूर्वीच्या माळशिरस- बेलसर गटात कऱ्हा नदीच्या अलीकडील व पलीकडील अशी गावे होती. नवीन रचना करताना कऱ्हा नदी हीच भौगोलिक दिशा ठरविण्यात आलीआहे. कऱ्हा नदीच्या अलीकडील गावे पिसर्वे- माळशिरस गटात तर नदी पलीकडील गावे खळद- कोळविहिरे गटात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. झुरंगे यांचे गाव माळशिरस – पिसर्वे गटात तर इंगळे यांचे गाव खळद- कोळविहिरे या जिल्हा परिषद गटात येत आहे. यामुळे दोघांनाही निवडणूक लढविण्यास संधी मिळाली असल्याने दोघांची राजकीय सोय करण्यात आली की, योगायोग जुळून आला अशी चर्चा सध्या मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे.

 मतदारसंघातील अडचणी

मध्यंतरीच्या काळात याच मतदारसंघामध्ये विमानतळाच्या हालचाली सुरू झाल्या. सुरुवातीला पूर्वीच्या बेलसर व आताच्या पिसर्वे गणा पारगाव परिसरातील जागा विमानतळासाठी सुचविण्यात आली, परंतु शेतकऱ्यांचा विरोध व राजकीय परिवर्तनामुळे या जागेत बदल करून बारामती, पुरंदर तालुक्याच्या हद्दीवरील नायगाव परिसरातील जागा सुचविली गेली. सरक्षण मंत्रालयाने मात्र येथील जागा विमानतळासाठी अनुकूल नसल्याचे सांगितले, यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदी वातावरण होते न होते तोच याच जागेत किंचितसा बदल करून खासगी विमानतळाचे भूत उभे राहिले.

प्रादेशिक पाणी योजना तीन वर्षापासून बंद

याच गटातील सोळा गावांना नाझरे धरणावरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारी पारगाव-माळशिरस प्रादेशिक योजना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे लाभ क्षेत्र दूषित झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनदेखील योजना बंदच आहे.

 पुरंदर उपसाची वाढती पाणीपट्टी

दुष्काळ, अतिवृष्टी, अल्प बाजारभाव अशा संकटांचा कायमच सामना करणाऱ्य पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पुरंदर उपसा योजना नवसंजीवनी ठरली आहे. मात्र योजनेच्या पाण्याची झालेली दुप्पट दरवाढ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. उत्पादनासाठी झालेला खर्चदेखील मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

 जमेच्या बाजू

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद मतदार संघात रस्ते, आरोग्य, पाणी वीज, इमारती व इतर बहुतांश कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहेत. पिसर्वे – माळशिरस जिल्हा परिषद गटात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांची समसमान ताकद आहे. कोणताही एक पक्ष गट काबीज करू शकणार नाही. आघाडी, युतीवर या गटाचे भवितव्य अवलंबून असून नवीन चेहरे मात्र या गटात कारभारी म्हणून दिसतील, यात शंका नाही.

 इच्छुक उमेदवार

काँग्रेसतर्फे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समितीसदस्या सुनीता कोलते, राष्ट्रवादीतर्फे जिल्हा नियोजन समिती सदस्यमाणिकराव झेंडे पाटील, गौरव कोलते तर शिवसेनेतर्फे जिल्हा नियोजन समिती सदस्य माणिक निंबाळकर, ॲड. नितीन कुंजीर, पिसर्वेचे सरपंच बाळासाहेब कोलते इच्छुक आहेत.

हेही वाचलतं का?

Back to top button