लाच खोरांनी लाज सोडली! कोल्हापूर पोलिस दलावर नामुष्कीची आफत | पुढारी

लाच खोरांनी लाज सोडली! कोल्हापूर पोलिस दलावर नामुष्कीची आफत

कोल्हापूर; दिलीप भिसे : अधिकाराचा दुरुपयोग करून ‘वर’कमाईला सोकावलेल्या शुक्राचार्यांमुळे कोल्हापूर पोलिस दलावर नामुष्कीची आफत ओढवत आहे. एकापाठोपाठ एक कायद्याचे रक्षक लाच खोरीत सापडत आहेत. नव्या वर्षात 17 जानेवारीपासून 4 फेब्रुवारीअखेर ‘एलसीबी’मधील दोन हवालदारांसह 4 कॉन्स्टेबल लाचखोरीत सापडले आहेत. गतवर्षी लाचखोरीप्रकरणी 5 पोलिसांवर बडतर्फीचा बडगा उगारण्यात आला, तरीही ‘वर’कमाईला सोकावलेल्यांना त्याचे भान उरलेेले नाही.

पोलिस ठाण्यात न्याय मिळेल, ही सामान्यांची भावना असते. याच हेतूने गरजू, असहाय्य व्यक्‍ती मदतीच्या अपेक्षेने पोलिस ठाण्याची पायरी चढत असते. मात्र, कारवाईचा बाऊ करून, असहाय्य लोकांना खिंडीत गाठून संबंधितांच्या पिळवणुकीचे प्रकार वाढीला लागले आहेत. बहुतांशी पोलिस ठाण्यांत हे प्रकार पाहायला मिळत आहेत.

बडतर्फ कारवाईचा फरक पडेना!

गतवर्षी ‘एसीबी’ने अटक केलेल्या पाचही कॉन्स्टेबलवर कारवाईची तात्पुरती मलमपट्टी न करता पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले. कोल्हापूर पोलिस दल लाचखोरीतून मुक्‍त होईल, अशी आशा होती. मात्र, या कारवाईची मात्रा चाललीच नसल्याचे लाचखोरीच्या प्रकरणांवरून स्पष्ट होत आहे.

लाचखोरीमुळे प्रतिमेला धक्‍का !

‘एलसीबी’ म्हणजे जिल्हाभर कामाची व्याप्ती. पोलिस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली या शाखेचा अलीकडच्या काळात कामगिरीचा धडाका असताना दोन कॉन्स्टेबलच्या कारनाम्यांमुळे कोल्हापूर पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्‍का बसला. विजय कारंडे, किरण गावडे याना 10 लाखांची लाच घेताना ‘एसीबी’ने रंगेहात पकडले. तत्पूर्वी ‘लक्ष्मीपुरी’ तील कॉन्स्टेबल दिग्विजय मर्दानेला 10 हजारांच्या लाच प्रकरणात 17 जानेवारीला कोठडीत बंद करण्यात आले.

नव्या वर्षातील ‘एसीबी’ची कारवाई

10 जानेवारी 2022 : 5 लाख 50 हजारांची लाच

संशयित : प्रसेनजित प्रधान (प्रांताधिकारी, राधानगरी)

संदीप डवर (सरपंच : फराळे ग्रामपंचायत, ता. राधानगरी)
17 जानेवारी : 10 हजारांची लाच : दिग्विजय मर्दाने (कॉन्स्टेबल, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे, कोल्हापूर)

21 जानेवारी : 10 लाखांची लाच :
विजय कारंडे, किरण गावडे (स्थानिक गुन्हे अन्वेषण) (एलसीबी)

4 फेब्रुवारी : 1500 रुपयांची लाच :
असीफ शिराज भाई (कॉन्स्टेबल, शहापूर पोलिस ठाणे)
जगदीश संकपाळ (पोलिसपाटील, यड्राव, ता. शिरोळ)

Back to top button