पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीचा आज शाही विवाह | पुढारी

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीचा आज शाही विवाह

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  प्रतिवर्षाप्रमाणे वसंत पंचमीला श्री विठ्ठल-रुक्मिणी चा विवाह मंदिरातील विठ्ठल सभामंडपात मोठ्या थाटात पार पाडला जातो. त्यानुसार शनिवारी (दि. 5) दुपारी 12 वाजता हा शाही विवाह पार पाडण्यासाठी मंदिर समितीने जय्यत तयारी सुरू केली आहे. सभामंडपात लग्नमंडप उभारला जात आहे. फुलांची आरास करण्यात येत असून वाजंत्री शोभा वाढवणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी चा शाही विवाह सोहळा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर समिती प्रयत्न करीत आहे. आज दुपारी 12 वाजता अक्षता पडणार आहेत. या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर मंदिर, विठ्ठल सभामंडप, सोळखांबी येथे नयनरम्य फुलांची सजावट करण्यात येत आहे. फुलांची सजावट ‘श्रीं’च्या गाभार्‍यातही करण्यात येत आहे.

आकर्षक फुलांच्या सजावटीमूळे मंदिरात नेत्रसुखद , मंगलमय वातावरण तयार करण्यात येते. वसंत पंचमी दिवशी सकाळपासूनच शाही विवाह सोहळ्याची तयारी म्हणून विठ्ठल सभामंडप येथे लग्न सभामंडप उभारण्यात येतो. या मंडपाला विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. मंडपही लावण्यात येतो. जसजसा लग्न मंडपात येण्याअगोदर विठ्ठलाला पांढराशुभ्र रेशमी पोषाख, तर रूक्मिणी मातेच्या मूर्तीला रेशमी साडी परिधान करण्यात येते. सोन्याचे दागिने परिधान करण्यात येतात. त्यामुळे देवांचे रुप अधिकच खूलून दिसते. लग्नसोहळ्यानमित्त लग्नमंडपात वाजंत्री आपल्या वाद्यांनी मंगलमय वातावरण निर्माण करतात. तर अंतरपाट धरुन भटजी मंगलाष्टका म्हणतात. मंगळाष्टकांवेळी अक्षता टाकून वर्‍हाडी मंडळी लग्न सोहळ्याचा आनंद व्दिगुणित करतात.

मंगलाष्टका होताच आलेल्या वर्‍हाडी मंडळींना मंदिर समितीच्यावतीने खास भोजनाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. एकंदरीत आज होणार्‍या विठ्ठल-रूक्मिणीच्या शाही विवाहाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.दरम्यान, गतवर्षी कोरोना महामारीमुळे श्री विठ्ठल-रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला होता. याही वर्षी कोरोना प्रादुभावामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणीचा विवाह मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे भाविक भक्तांतून नाराजी व्यक्त होत आहे. असे असले तरी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याचे थेट प्रेक्षपण ठेवण्यात येणार आहे. वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर होणारा श्री विठ्ठल-रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा भाविकांना घरबसल्या पाहता येणार आहे. दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारा विवाह सोहळा मात्र दोन वर्षांपासून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येत आहे.

मागील वर्षी करण्यात आलेल्या तयारीच्या तुलनेत आज होणारा लग्नसोहळा अधिक उत्तमपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. श्रींच्या पोशाखाची तयारी, सभामंडपाची सजावट, फुलांची आकर्षक साजवट, जेवणाची व्यवस्था, याबाबत तयारी करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेत लग्नसोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंदिर समिती प्रयत्नशील आहे.

– बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक

हेही वाचलतं का?

Back to top button