सांगली : 18 टी.व्हीं.वर दुकानातील कामगारानेच डल्ला मारल्याचे उघड | पुढारी

सांगली : 18 टी.व्हीं.वर दुकानातील कामगारानेच डल्ला मारल्याचे उघड

सांगली : पुढारी वृत्तसेवा : एका कंपनीच्या 3 लाख 66 हजार 558 रुपये किमतीच्या 18 टी.व्हीं.वर दुकानातील कामगारानेच डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी विनीत विजय सावळे (वय 24, रा. सांगली, फौजदार गल्ली) या संशयितास अटक करून 18 टीव्ही जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी सांगितले की, श्रीनीवास सुभाष कलगुटगी व विशाल रामचंद्र कलगुटगी (रा. वडर गल्ली) या दोघांच्या घरी एका कंपनीच्या काही टी.व्ही. असून त्या चोरीच्या आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी या दोघांच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी 18 एलसीडी टी.व्ही. मिळाले. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मित्र विनीत सावळे याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

तो टीव्ही गोडावून किपर म्हणून काम करतो. त्याने दोघांना सांगितले की, गोडाऊनमध्ये टीव्ही ठेवण्यास जागा नाही, तरी हे टीव्ही तुमच्या घरी ठेवा. माधवनगर मधील गोडाऊन मोकळे झाले की टीव्ही घेऊन जातो. त्यानंतर सावळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी माधवनगर मधील एका कंपनीचे टीव्ही गोडावून किपर म्हणून काम करतो. तेथील मालकास काही न समजता गोडावूनमधून चोरुन आणून व बिलाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून खाडाखोड करून टीव्ही कलगुटगी यांचे घरी ठेवल्या असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी हे टीव्ही जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरिक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या पथकातील महंमद रफीक शेख, सुनिल चौधरी, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचलतं का?

Back to top button