पुणे : प्रेयसीच्या मुलाचे प्रियकराकडून अपहरण | पुढारी

पुणे : प्रेयसीच्या मुलाचे प्रियकराकडून अपहरण

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : घटस्फोटीत प्रेयसीसोबत वाद झाल्यानंतर त्याचा राग काढण्यासाठी थेट तिच्या पाच वर्षाच्या मुलाचे प्रियकराने अपरहण केले. ही घटना बिबवेवाडी परिसरात बुधवारी रात्री पावने आठच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या मुलाची अवघ्या तीन तासात सुखरुप सुटका केली. यावेळी अपहरणकर्त्याला देखील बेड्या ठोकल्या आहेत. बाणेर येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत ही कारवाई केली. घटस्फोटीत महिलेच्या प्रियकराकडून हे कृत्य करण्यात आले होते.

याप्रकरणी बिबवेवाडी येथे रहाणार्‍या एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी स्वप्निल रमेश शिंदे (वय २७, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. स्वप्निल हा वाहनचालक म्हणून काम करतो. तो मुळचा तुळजापूर येथील असून, आई-वडिलांसोबत राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी महिला पाच वर्षाच्या मुलासह बिबबेवाडी परिसरात वास्तव्यास आहेत. ती कर्वेनगर येथील एका मॉलमध्ये हाऊसकिपींगचे काम करते. घटस्फोट झाल्यापासुन सुमारे ३ वर्षांपासुन ती मुलगासह एकटीच राहते. कामावर जाताना ती मुलाला जवळच राहणार्‍या भावाकडे सोडून जाते. तिचे आठ महिण्यापुर्वी आरोपी स्वप्निल बरोबर प्रेम संबंध निर्माण झाले होते. तेव्हापासून तो तिच्या घरी राहण्यास होता. स्वप्नील तिला नेहमी मारहाण करायचां. त्यांच्यामध्ये ३१ जानेवारी रोजी रात्री भांडणे झाल्याने फिर्यादी मुलासह भावाच्या घरी राहण्यास गेली होती.

दरम्यान २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी कामावर निघून गेल्या होत्या. त्या कामावर असताना स्वप्नील शिंदे याने फोन करून शिवीगाळ करून फिर्यादीला तुला व तुझ्या मुलाला मारून टाकतो अशी धमकी दिली होती. फिर्यादीने तेव्हा त्याचा फोन कट करून टाकला. मात्र सायंकाळी पावणे आठच्या सुमारास फिर्यादीला तिच्या भावाचा फोन आला. तुझ्या मुलाला दोन लोकांनी फिरवून आणतो असे सांगुन दुचाकी गाडीवरून कुठेतरी घेवून गेल्याचे सांगितले. फिर्यादीने तातडीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

बाणेर येथील अपहरणाच्या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने तपासकार्यास सुरवात केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गाडीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी काही पथके आरोपीच्या घरी आणि ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी करत होती. मात्र आरोपीचा माग लागत नव्हता, त्याचा फोनही बंद असल्याने पोलिस मुलाचे काही बरेवाईट होऊ नये या चिंतेत पडले होते. दरम्यान आरोपी कोंढवा परिसरात एका रिक्षात मुलासह पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या पथकाला सापडला.

त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने वादातून मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे, गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक प्रवीण काळोखे, कर्मचारी अमित पुजारी, तानाजी सागर, सतीश मोरे, अतुल मांगडे, देवकाते व देशमाने यांच्या पथकाने केली.

Back to top button