पालघरचे घाट रस्ते बनले मृत्यूचे सापळे! | पुढारी

पालघरचे घाट रस्ते बनले मृत्यूचे सापळे!

निखिल मेस्त्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील महत्त्वाचे घाटरस्ते धोकादायक बनले आहेत. रस्तेे खड्डेमय बनले असून, दरडी कोसळण्याचा धोका अधिक असल्याने पावसाळ्यात तर या मार्गाने प्रवास करणे हे वाहनचालकांना जिकिरीचे ठरणारे असल्याचे जाणकार सांगतात.

घाट रस्ता 1

तोरंगण घाट ते त्र्यंबकेश्वर अशा 30 कि.मी.चा हा घाट जेवढा निसर्गरम्य, मनमोहक आहे. तेवढाच जीवघेणाही आहे. कारण, या रस्त्यावरून एमआयडीसी नाशिक ते तारापूर येथे मालवाहतुकीसह नाशिक ते पालघर, डहाणू भाजीपाला वाहतूक करणार्‍या वाहनांची मोठी रेलचेल असते. गुजरातहून त्र्यंबकेश्वर, शिर्डी जाणार्‍या भाविकांसाठीही याच रस्त्याचा मोठा आधार आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर वळणे आणि चढ-उताराच्या रस्त्यावर अपघात प्रवण क्षेत्र असे नाम फलक, सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बांधण्यात आले आहेत. मात्र, साईटपट्टी आणि संरक्षण भिंती बांधलेल्या नाहीत.

घाट रस्ता 2

जव्हार-कशिवली घाट धोकादायक बनत चालला असून, जव्हार-विक्रमगड-मनोर मार्गावरील डहाणू फाट्याजवळ कशिवली घाटातील खोल दरीच्या वळणावर रस्ता खचून भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी कशिवली घाटात अनेक लहान-मोठ्या अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत. जव्हारहून मनोर-मुंबई-अहमदाबाद महामार्ग, पालघरकडे जाणारा कशिवली घाट लागतो. कशिवली घाटाचा रस्ता अरुंद आहे. त्यातच डहाणू फाट्यापुढे वळणावर पालघरकडे जाताना खोल दरीला लागून उजव्या बाजूला मोठा खोल खड्डा पडला आहे.

घाट रस्ता 3

मोखाडा ते त्र्यंबकेश्वरमधील घाट रस्ता अतिशय धोकादायक बनला असून पावसाळ्यात झाडे पडणे, दरड कोसळून दगड रस्त्यावर येणे असे प्रकार घडत असतात. यामुळे पावसाळ्यात हा घाट अतिशय धोक्याचा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. मात्र, याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. याहीपेक्षा भयंकर प्रकार म्हणजे याच घाटातील एका उतारावर एक धोकादायक वळण आहे. त्याच्या एका बाजूला मोठी दरी आहे. मात्र, एकदम याच वळणावरील लोखंडी संरक्षक असलेले बॅरिकेडस् पडून गेले आहेत. रस्ता अजून धोकादायक झाला आहे.

Back to top button