Death of a shark : शवविच्छेदनात ‘त्या’ शार्क माशाच्या पोटात आढळली पंधरा पिल्ले, प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलोपेक्षा अधिक | पुढारी

Death of a shark : शवविच्छेदनात 'त्या' शार्क माशाच्या पोटात आढळली पंधरा पिल्ले, प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलोपेक्षा अधिक

पालघर; पुढारी वृत्तसेवा : वैतरणा खाडी पात्रात आलेल्या शार्क माशाच्या मृत्यूबाबतच्या बातमीनंतर आणखी एक माहिती समोर आली आहे. मृत शार्क माशाच्या माशाच्या पोटात पंधरा पिल्ले आढळून आली आहेत.  वनविभागाच्या निर्देशानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १४) मृत शार्क माशाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनानंतर तिच्या पिल्लांबाबतची माहिती समोर आली आहे.

वैतरणा खाडी पात्रात आलेल्या शार्क माशाचा मंगळवारी (दि. १३) रात्री ओहोटीच्या वेळी खाडी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने उघड्यावर पडून मृत्यू झाला. मृत शार्क मासा मनोर वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ताब्यात घेत डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वाइल्ड लाइफ रेस्क्यू पथकाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या निर्देशानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १४) मृत शार्क माशाचे उपवनसंरक्षक कार्यालयाच्या आवारात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी सुरू झालेले शवविच्छेदन रात्री उशिरापर्यंत चालले. बुल शार्क माशाच्या डोक्याच्या भागात मार लागल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज शवविच्छेदनानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मृत शार्क मासा शवविच्छेदन अहवाल

मृत शार्क मादी जातीची असून गर्भवती असल्याचे शवविच्छेदनात आढळून आले. बुल शार्कचे वजन सुमारे साडेचारशे किलो असल्याचे समोर आले आहे. गर्भाशयात पंधरा पिल्ले आढळली तर प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलो पेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शार्क मादी पिल्ले सोडण्यासाठी खाडी पात्रात आल्याचा अंदाज

गर्भात पूर्ण वाढ झालेली पिल्ले सोडण्यासाठी शुद्ध पाण्याच्या स्रोताच्या शोधात खाडी पात्रात आल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी राहुल संखे यांनी वर्तवला आहे. मरण्याआधी बुल शार्क मादीने खाडी पात्रात काही पिल्ले सोडल्याची शक्यता वर्तवली आहे.

शार्क माशाच्या पोटात पंधरा पिल्ले, प्रत्येकाचं वजन पाच किलोपेक्षा अधिक

शवविच्छेदना दरम्यान शार्कच्या गर्भाशयात लहान बेबी बुल शार्क असल्याचे दिसून आले. गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर डोके गर्भ मुखाच्या बाजूने असते परंतु मृत शार्क माशाच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ पिल्लांच्या शेपटीचे फिन आढळले. प्रत्येक बेबी शार्क माशाला वेगळी नाळ आणि प्लेसनटा बॅग हॊती. दरम्यान एकूण पंधरा मृत पिल्ले असल्याचे आढळून आले. प्रत्येक पिल्लाचे वजन पाच किलोपेक्षा अधिक होते.

बुल शार्कचे श्रवणेंद्रिय मस्तकाच्या पाठीमागे उजव्या व डाव्या बाजूस हाडाच्या पोकळीत असते. दोन अंतर्कर्णांचा उपयोग ध्वनिज्ञानासाठी काही प्रमाणात तोल सांभाळण्यासाठी होत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. बुल शार्क युरीहॅलिन असल्याने खाऱ्या आणि गोड्या पाण्यातही वाढू शकतात. बुल शार्क नद्यांच्या वरच्या प्रवासासाठी ओळखले जातात. मिसिसिपी नदीपर्यंत अल्टोन, इलिनॉय , समुद्रापासून सुमारे 1,100 किलोमीटर (700 मैल) पर्यंत प्रवास करण्यासाठी बुल शार्क ओळखले जातात. परंतु गोड्या पाण्यात माणसांसोबतच्या काही संवाद नोंदवले गेले आहेत. मोठ्या आकाराचे बुल शार्क किनाऱ्यावरील हल्ल्यांसाठी जबाबदार असतात.

ग्लिफिस वंशाच्या नदीतील शार्कच्या विपरीत,गोड्या पाण्याच्या अधिवासात टिकून राहण्याची क्षमता असूनही, बुल शार्क खऱ्या अर्थाने गोड्या पाण्यातील शार्क नाहीत. आफ्रिकेतील झांबेझी शार्क (अनौपचारिकरित्या झांबी ) आणि निकाराग्वामधील निकाराग्वा सरोवर शार्क म्हणून ओळखली जाणारी बुल शार्क ( कार्चरिनस ल्यूकास ) रेक्वीम शार्कची एक प्रजाती असून ती जगभरातील समुद्रकिनाऱ्यांलगतच्या उबदार, उथळ पाण्यात आणि नद्यांमध्ये आढळते.ते आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. मुख्यत: उष्ण, उथळ खाऱ्या आणि गोडे पाणी नदीच्या खालच्या भागातील मुख परिसरात आढळतात. आक्रमक स्वभावाचा असल्याने बुल शार्कची संख्या कमी होण्यास कारण आहे. IUCN रेड लिस्टमध्ये असुरक्षित प्रजाती म्हणून नोंद आहे. यापूर्वी गुजरात राज्याच्या समुद्र किनारी भागात वैविध्यपूर्ण असलेल्या सागरी परिसंस्थेत बुल शार्क मासा आढळून आलेला आहे.

मनोर येथील वैतरणा खाडीच्या शेवटच्या भागात आढळलेल्या शार्क माशाची ओळख पटवून माशाचे संवर्धन आणि जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत पालघर पंचायत समितीचे पशु प्रजनन शास्त्र अधिकारी डॉ राहुल संखे (MVSC) यांनी व्यक्त केले.

Back to top button