Nashik Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर

Nashik Ganeshotsav : विसर्जन मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अनंत चतुर्दशीनिमित्त शहरात निघणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीवर पाेलिसांच्या मदतीला यंदा सीसीटीव्ही यंत्रणा राहणार आहे. मिरवणूक मार्गावर आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, त्यामार्फत मिरवणुकीतील हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार स्मार्ट सिटीने मुख्य मिरवणूक मार्गावरील बारा ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित केले आहेत. या सीसीटीव्हींचे नियंत्रण पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात देण्यात आल्याने बंदोबस्तासह प्रत्येक हालचालीवर पोलिसांची करडी नजर आहे. (Nashik Ganeshotsav)

संबधित बातम्या :

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव आढावा बैठकीत मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी त्यासंदर्भात पूर्ण काम झाल्याची माहिती दिली. मुख्य मिरवणूक मार्गावरील प्रमुख चौकांसह सिग्नलजवळ हे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पोलिस आयुक्तालयासह स्मार्ट सिटीच्या नियंत्रण कक्षात या सीसीटीव्हींचे नियंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना त्यांच्या नियंत्रण कक्षातून गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवता येणार आहे. मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये झालेले अंतर, बेशिस्त नाचणारे, टवाळखोर, गुन्हेगारांवर लक्ष ठेवता येणार असून, पोलिसांचे कामकाज सुलभ होणार आहे. (Nashik Ganeshotsav)

मार्गाची फेरपाहणी होणार

गणेशोत्सवापूर्वी पोलिस, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, महावितरणसह संबंधित यंत्रणा व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी वीजतारा, अतिक्रमण, फलक यांचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर संबंधित यंत्रणांनी तोडगा काढून बहुतांश कामे मार्गी लावल्याचे चित्र आहे. तरीदेखील विसर्जनापूर्वी पुन्हा मिरवणूक मार्गाची फेरपाहणी करून नियोजन ठरविण्यात येणार आहे.

असा आहे मुख्य विसर्जन मार्ग

भद्रकालीतील वाकडी बारव येथून मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणूक फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरवरून गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून गोदाकाठावरील म्हसोबा महाराज पटांगणाकडे मार्गस्थ होईल.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news