NCP News : बारामतीत गोपिचंद पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीकडून जोडे | पुढारी

NCP News : बारामतीत गोपिचंद पडळकरांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीकडून जोडे

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपिचंद पडळकर यांच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्या विरोधात गुरुवारी (दि. २१) राष्ट्रवादीकडून येथील भिगवण चौकात आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत तीव्र शब्दात पडळकर यांचा निषेध केला. यापुढे पडळकर बारामतीत आल्यास त्यांना चपलेने मार देत तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आमदार पडळकर यांनी नुकतेच अवमानकारक वक्तव्य केले. राष्ट्रवादीने पडळकर यांचा या विषयावरून चांगलाच समाचार घेतला आहे. गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता पडळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन येथील भिगवण चौकात करण्यात आले. पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगावचे ज्येष्ठ संचालक केशवराव जगताप, योगेश जगताप, युवकाध्यक्ष अविनाश बांदल, नितीन शेंडे, श्रीकांत जाधव, दिलीपराव ढवाण आदींनी तीव्र शब्दात पडळकर यांचा निषेध केला. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, नगरसेवक बिरजू मांढरे, अभिजित जाधव, नवनाथ बल्लाळ, बाजार समितीचे सभापती सुनील पवार, सोमेश्वरचे संचालक संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, सुनील भगत आदी यावेळी उपस्थित होते.

 राष्ट्रवादीकडून खुले आव्हान

गोपिचंद पडळकर यांचा मागील विधानसभा निवडणूकीत बारामतीकरांनी १ लाख ६५ हजारांच्या मताधिक्याने पराभव करत त्यांची राज्यातील जागा त्यांना दाखवून दिली आहे. अशा स्थितीत पवार कुटुंबाबद्दल बेताल वक्तव्ये करून ते मिडियाचे लक्ष वेधून घेत आहेत. ते यापुढे बारामतीत आल्यावर त्यांना जोडे मारू तसेच काळे फासले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button