नाशिक : वणी येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; सहा जणांचा घेतला चावा | पुढारी

नाशिक : वणी येथे भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; सहा जणांचा घेतला चावा

वणी, पुढारी वृत्तसेवा : वणी शहरात एकाच दिवशी पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घालीत सहा जणांना चावा घेवून जखमी केल्याची घटना घडली. दोन दुचाकींना कुत्रे आडवे आल्याने मोटरसायकलस्वार पडून एका महिलेसह ३ जखमी झाले आहे. वणी शहरात भटक्या श्वानांसह त्यातील काही पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्यांनी वणी गावातील विविध भागात चावा घेवून जखमी केल्याच्या घटना वाढू लागल्या आहे. आज येथील थोरात गल्ली, देशमुख गल्ली, बाजार गल्ली, बिरसा मुंडा चौक परीसरात पाच नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला करीत चावे घेतले आहेत. यात शरद पंढरीनाथ चौधरी (रा. नाशिक), राजेंद्र सदाशिव बच्छाव (रा. वणी), राजेंद्र मनोहर चौधरी (रा. फोपशी), योगेश दत्तात्रय रेहरे, सतीश जयवंतराव थोरात व गणेश भाऊसाहेब जाधव (रा. वणी) हे श्वान चाव्याने जखमी झाले आहे.

जखमींना येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जणांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच विद्युत वितरण कंपनीचे वायरमन लक्ष्मण गंगा कामडी हे वीज बील वसुलीसाठी जात असतांना ग्रामीण रुग्णालयासमोरच त्यांच्या दुचाकीला कुत्रे आडवे येवून दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या हाताला फॅक्चर झाले आहे. दरम्यान रात्री बेरात्री गावात दुचाकी व पायी येणाऱ्यांवर ठिकठिकाणी ग्रामस्थांवर कुत्रे धावून जात असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गुजरात राज्यातून व पिपंळगाव रस्त्याच्या बाजूने काही लोक गाडीतून कुत्रे आणून वणी परीसरात सोडत असल्याचे नागरीकांत बोलले जात असून ग्रामस्थांनी  भटक्या  कुत्र्यांचा  बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button