नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सलग तिसर्या दिवशीही (दि.16) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नाशिक शहरात संततधार कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, सटाण्यात द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणाच्या विसर्गात सायंकाळी कपात करण्यात आली असली तरी गोदाघाटावरील पूरस्थिती कायम आहे. दारणा, पालखेडसह अन्य धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे.
राज्यभरात पावसाने जोरदार कमबॅक केले असून, मुंबई व उत्तर कोकणात मुसळधार बरसत आहे. नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि.16) पावसाचा वेग वाढला आहे. दिवसभरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने सर्वसामान्य नाशिककरांना नाहक त्रास सहन करावा लागला. दिंडोरी रोड, पेठ रोड, रामवाडी परिसरासह शहराच्या अन्य भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने त्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना तारेेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळी विसर्गात 4,815 क्यूसेकवरून कपात करून 1,068 क्यूसेक करण्यात आला. मात्र, तरीही गोदेची पूरस्थिती कायम असल्याने गोदाकाठावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर सटाण्यात पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात आलेल्या आहेत. दरम्यान, पावसाची संततधार कायम असल्याने दारणा, पालखेड, चणकापूर, पुनद, हरणबारीसह अन्य धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही त्याचा वेग अधिक असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा जोर कायम असल्याने पुढील दोन दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, पुढील दोन दिवस इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. नद्या-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
– गंगाथरन डी., जिल्हाधिकारी, नाशिक
जायकवाडीला 95 टीएमसी पाणी
चालू वर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून नांदूरमध्यमेश्वरमार्गे 95 टीएमसी पाणी जायकवाडीत पोहोचले आहे. जायकवाडीच्या मृतसाठ्यासह एकूण क्षमता 103 टीएमसी आहे. नगर जिल्ह्याच्या धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्याचे प्रमाण वेगळे आहे. त्यामुळे पुुढील जूनपर्यंत नाशिक-नगरमधून मराठवाड्याला अतिरिक्त पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही.