

दत्तात्रय नलावडे
खडकवासला : पानशेत-सिंहगड भागात बिबट्यांची दहशत सुरूच आहे. वनखात्याने खबरदारीसाठी परिसरात रात्रीच्या गस्ती सुरू केल्या असून पर्यटकांसह स्थानिक शेतकरी, गुराख्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्यांची शिकार करण्यासाठी बिबटे खडकवासलाजवळील लष्कराच्या डीआयडी संस्थेत, तसेच पानशेतजवळील रुळे येथील फार्महाऊसमध्ये शिरल्याचे नुकतेच वनविभागाच्या पाहणीत आढळून आले.
आंबी, पानशेत भागात बिबट्याने शेळ्या, कुत्र्यासह दहा बारा जनावरांचा फडशा पाडला आहे. आंबेड, रुळे भागात बिबट्यांची वर्दळ वाढल्याने वेल्हे तालुका वनविभागाने या परिसरात रात्रीच्या गस्ती सुरू केल्या आहेत. वेल्हे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे. एम. डी. भोकरे, बंडू खरात, मनोज महाजन, जे. यू. बंगाळ यांच्या पथकाने स्थानिक शेतकर्यांसह जंगला शेजारच्या रानात व वस्त्यांत गस्ती सुरू केल्या आहेत.
बिबट्यांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. परिसरातील जंगलात बिबट्यांचा अधिवास आहे. नागरी वस्त्यांत बिबट्या येऊ नये यासाठी पथकाने गस्ती सुरू केल्या आहेत. गिर्यारोहक, पर्यटकांनी जंगलात जाऊ नये. जंगलात जनावरे सोडू नयेत, यासाठी गुराखी व शेतकर्यांना आवाहन करण्यात आले आहे.
-प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा (पुणे) वनविभाग