नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारची मोडस ऑपरेंडी ठरली आहे. एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून त्याच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करायची. त्यातून बदनामी करायची. त्यानंतर मुंबईसह राज्यातील काही निवडक पोलिस ठाण्यांत जाऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा. दुसरीकडे महिला आघाडीने करावाईची मागणी करायची. मुंबईच्या महापौरांनी महापौर म्हणून नाही, तर पक्षाच्या नेत्या म्हणून पोलिसांकडे तक्रार करायची, हे शिवसेनेचे टुलकिट आहे. पूर्वी नक्षलवादी वापरायचे आता शिवसेना वापरत असल्याची टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.
नाशिक दौर्यावर आलेल्या आशिष शेलार यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रज स्मारक येथे कुसुमाग्रजांना अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शेलार म्हणाले की, 'काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्यांचे वर्तन इंग्रजांच्या भावासारखे आहे. या काँग्रेसच्या समर्थनासाठी शिवसेनेने सावरकरांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते. त्यांनीही आता भगव्याची जबाबदारी फक्त भाजपच्या गळ्यात असल्याचे विधान केले होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व कोणाचे, यावरूनही राजकीय वाद रंगलेला दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेवर टीका करताना त्यांनी शिवसेना सोशल मीडियावर कशा पद्धतीने एखाद्यास टार्गेट करून त्यांची बदनामी करीत असते, याबाबतचे टुलकिट सांगितले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गेल्या 25 वर्षांत झाले नाही, तेवढे काम गेल्या पाच वर्षांत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मराठी भाषेचा सुदिन लवकरच येईल, असेही आशिष शेलार यांनी याप्रसंगी सांगितले.